भाजप अध्यक्षपदी अमित शहांना मुदतवाढ?

भाजप अध्यक्षपदी अमित शहांना मुदतवाढ?

भाजपच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळयात पडणार या चर्चांना ऊत आला होता. मात्र, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. अमित शाह डिसेंबरपर्यत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. विविध राज्यांच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका संपेपर्यंत डिसेंबर २०१९ पर्यंत अमित शहा भाजपच्या अध्यक्षपदी कायम राहतील. या संदर्भात इंडिया टूडेने वृत्त दिलं आहे.
नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे सरचिटणीस आणि राज्यांतील भाजपच्या अध्यक्षांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आत्ताच कोणाची निवड करण्याबाबत तोडगा निघाला नाही. या वर्षाच्या शेवटी पक्षांतर्गत निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रीय अध्यक्षपद बदलण्याचा विचार व्हावा, असे ठरले.
पक्षाने सध्या सदस्य नोंदणी मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या सदस्यसंख्येत 20 टक्‍क्‍यांनी वाढ होईल, अशी भाजपला आशा आहे. सध्या भाजपचे 11 कोटी सदस्य असून यात 20 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचे त्यांचे ध्येय आहे. भाजपची धुरा ही अमित शहांकडेच असावी, अशी अनेक भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.