पूरग्रस्त कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप – डॉ....

पूरग्रस्त कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप – डॉ. दीपक म्हैसेकर

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी २ हजार २९६ क्विंटल गहू व तांदूळ आणि १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पूरग्रस्तांना लागणारी मदत व करावयाच्या उपाय-योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत. त्याची ताततडीने अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यकते प्रमाणे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तातडीने मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. आता पर्यंत विभागातील १४ हजार २९९ कुटुंबांना या रकमेचे वाटप करण्यात आले असून उर्वरित पूरग्रस्तांना मदतीच्या वाटपाचे काम सुरूच आहे. सांगली जिल्ह्यात ३ लाख ११ हजार २२० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४३५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३२ रस्ते वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ पैकी ६२ रस्ते खुले झाले आहेत. एसटी वाहतुकीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील बंद ४५ मार्गांपैकी ३७ मार्ग सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पैकी २३ मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
बँकीग  सेवेच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात ३२९ एटीएमपैकी २२६ एटीएम सुरु झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ६४७ पैकी ३२० एटीएम सुरु झाले आहेत. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हे काम लगेच  युध्द पातळीवर  सुरू करण्यात  आले असून त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्र, ३ हजार ९७ रोहित्र व १ लाख ५८ हजार ६५१ बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा महावितरणने पुर्ववत केला आहे. तर सांगली जिल्ह्यात ११ उपकेंद्र, २ हजार ४९६ रोहित्र व १ लाख २२ हजार ८५३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.