पुरग्रस्थांची व्यथा : २००५ ला मदत मिळाली नाही, आता मिळेल का ?

पुरग्रस्थांची व्यथा : २००५ ला मदत मिळाली नाही, आता मिळेल का ?

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील नद्यांची पाणी पातळी कमी झाली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तीन गावं मात्र, अद्यापही पुराच्या पाण्याने वेढलेली आहेत. त्यातील ८ हजार १९६ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
2005 सालीही शिरोळ गावात पूर आला होता. याआधी पुराचे पाणी जास्त नव्हतं. मात्र, यावेळी पुराचे पाणी चार पटीने वाढले आहे. संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. नागरिकांना 14 किमी लांब कर्नाटक राज्यातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तब्बल 11 दिवस हे गाव पाण्यात होते. विशेष म्हणजे गावाला हेलिकॉप्टरने येणारी मदत नाकारावी लागली. कारण पॅकेज खाली सोडताना घरांच्या छताचे नुकसान होत होते.
एका गल्लीत हजारहून अधिक जनावरे, काही मोजक्या उंच घरात 300 हुन अधिक माणसं गावांत अडकली होती. पाणी ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात मदत गावाच्या पूरबाधितांपर्यंत पोहचली. मात्र, सरकारी मदत अजूनही 5000 हजारांवरच थांबली आहे. गावात अजूनही पंचनामे होण्याची गावकरी वाट बघत आहेत. मागच्या पुरानंतर नागरिकांना तुटपुंजी भरपाई देण्यात आली. पुनर्वसनाची आश्वासने दिली. पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी गावच्या तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. पाऊस काळात सुरक्षिततेसाठी बोटी देण्यात आल्या आणि काही काळानंतर या सर्व उपाययोजना गळून पडल्या. अजूनही पूरबाधित सरकारी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आपलं घर उभं करत होते. तोच पुन्हा आस्मानी संकटाने त्यांना शून्यावर उभे केले आहे. जिथे मागच्या पुराच्या योजनाच पोहोचल्या नाहीत. तिथे पुन्हा तेच घडणार. पण दुसरा मार्ग नसल्याने तोंडाशी आलेलं पिक मागच्या पुरातून उभं केलेलं घर, आणि मुलांप्रमाणे जपलेली जनावरं गमावल्यानंतर आता पुन्हा पूरबाधित शासनाकडून मदतीची आस लावून बसले आहेत.
एक घर उभा करायला आयुष्य जातं. कष्टानं घरं उभा करायचं आणि पुराच्या तडाख्यात त्याचं होत्याचं नव्हतं होऊन जातं. परत तेच घर उभा करायचं आणि पुन्हा एकदा पुरानं ते घरं उध्वस्त करायचं. अशी परिस्थिती गावातील लोकांची झाली आहे. त्यातच आलेल्या आस्मानी संकटांवर मात करण्यासाठी सरकारनं जर मदतीचा हात दिला नाही तर, या पुराग्रस्तांनी कसं उभा राहायचं असा सवाल या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सध्या गावातील अनेक घराचं नुकसान झालं आहे. त्यातच जी घर आहे त्यात इतक्या दिवस पाणी राहिल्याने ते मनुष्य वस्तीस योग्य राहणार नाही. ती कधीही या पूर ग्रस्तांच्या अंगावर कोसळू शकतात. त्यामुळं ज्यांची घर आहेत त्यांच्यावर कुठं जावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.