आरे आणि सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता

आरे आणि सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता

76
0

जनताच जर जागरूक नसेल तर सरकार आणि सरकारी अधिकारी पर्यावरणाचा कसा विचार करतात, या विषयी लेखक Andrew McAfee त्यांचे पुस्तक More from Less मध्ये एक मजेशीर किस्सा सांगतात.

ते सांगतात ‘समुद्रातील व्हेल मासा मारणे पर्यावरणासाठी कसे घातक आहे. हे लक्षात आल्यावर जगभरातील राष्ट्रांनी एक आंतरराष्ट्रीय करार केला. प्रत्येक राष्ट्र किती व्हेल मासे मारु शकतील, याचा एक कोटा त्यांनी ठरविला. यात रशियाही होते, पण रशियाने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त व्हेल मारली, ते ही काही शे, हजार नाही तर लाखो’.
पर्यावरणाचा काडीचाही विचार न करता रशियाने लाखो व्हेल का मारलेत ? यामागील कारण बघितले तर हसू येईल आणि रागही.

जगभरात ज्या व्हेल मारल्या जात होत्या. त्यामागे आर्थिक कारणं होती. ज्यात व्हेल पासून मिळणारे मांस, मार्गारीन आणि ग्लिसरीन प्रमुख होते. रशियन लोकांना व्हेल चे मांस विशेष आवडत नव्हते आणि मार्गरिन व ग्लिसरीनच्या बाबतीत रशिया आधीच स्वयंपुर्ण होता. तरीही त्यांनी लाखो व्हेलची कत्तल करून पर्यावरणाची हानी केली.

कारण काय तर रशियाचे या बाबतचे अजब आर्थिक धोरण. रशियाच्या पंचवार्षिक धोरणात किती टन मासेमारी झाली. ही विकास मोजण्याची एक कसोटी होती, त्यामुळे वजनात जास्त भरणाऱ्या व्हेल माश्यांची शिकार गरज नसतांना वाढली. जास्तीत जास्त टन मासे मारणारे अधिकारी विकासदूत म्हणुन ओळखल्या जाऊ लागले.

व्हेल माश्यांच्या या कत्तलीचे व पर्यावरणावरील त्याच्या विपरीत परिणामांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी एक शास्त्रज्ञ मासेमारी मंत्रालयाच्या प्रमुखाकडे गेला व त्यांना सांगू लागला की, ही कत्तल जर अशीच सुरु राहीली तर येणाऱ्या पिढी कधीही व्हेल मासा बघू शकणार नाही, आपल्याला आज जरी फरक पडत नसला तरी येणारी पिढीला मात्र, याचे परीणाम भोगावे लागतील. यावर त्या प्रमुखाने जे उत्तर दिले त्यावरुन हे लोक कसा विचार करतात ते आपल्या लक्षात येईल तो प्रमुख म्हणाला

“ती येणारी पिढी माझा राजीनामा मागणार नाही पण तुमचं ऐकलं तर आजच मला माझा राजीनामा द्यावा लागेल.”

सरकार आणि अनेक उच्च शिक्षित सरकारी अधिकारी आता आरेत होणाऱ्या कत्तलीच समर्थन करताना दिसतील, ते विकासाचीच भाषा वापरतील. याचा अर्थ अश्या प्रकारच्या निर्णयाचे परीणाम त्यांना माहिती नाही आहेत असे नाही. पण त्यांना हे पक्के माहित आहे की

“येणारी पिढी त्यांना आज त्यांचा राजीनामा मागणार नाही.”