राज्य कर्जबाजारीच

राज्य कर्जबाजारीच

मार्च 2019 अखेर सुधारित अंदाजानुसार राज्यावरील एकूण कर्जाची रक्कम 4 लाख 14 हजार 411 कोटी रूपये इतकं आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान पाहता हे कर्ज वाजवी प्रमाणात असल्याचे वित्तीय निर्देशांकावरुन दिसून येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.
27 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प 4 लाख 3 हजार 207 कोटी रूपयांचा सादर करण्यात आला होता. आता नवीन गोष्टींचा समावेश झाल्यामुळं त्यात 1 हजार 586 कोटी रूपयांची वाढ झालेली आहे.
सन 2019-20 या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 3 लाख 14 हजार 640 कोटी 12 लाख रूपये अपेक्षित आहे. तर महसुली खर्च 3 लाख 34 हजार 933 कोटी 6 लाख रूपये  अंदाजित केलेला आहे. त्यामुळं महसूली तूट 20 हजार 292 कोटी 94 लाख रूपये इतकी राहिल, असा अंदाज आहे.
सन २०१८-१९ साठी राज्याचा कर संकलनाचा सुधारित अंदाज रुपये एक लाख अठ्ठयाऐंशी हजार नऊशे एकतीस कोटी होता. राज्याने एक लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस कोटी रूपयांचा कर संकलित केला आहे.
जीएसटीच्या अवलंबनानंतर महाराष्ट्रामध्ये कराचा पाया विस्तृत झाला असून नोंदीत करदात्यांची संख्या सात लाख पंच्याहत्तर हजारावरुन पंधरा लाख पन्नास हजारवर गेली. मूल्यवर्धित कर कायद्याखालील तसेच राज्यकर विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कायद्याखालील थकबाकीच्या शीघ्र वसुलीसाठी अभय योजना जाहीर  केली होती, या योजनेअंतर्गत १७ जून २०१९ पर्यंत पंधरा हजार सहाशे पन्नास इतके अर्ज प्राप्त. साडे सातशे कोटी रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे.
जास्तीत जास्त करदात्यांना या अभय योजनेचा फायदा घेता यावा व अत्यावश्यक रक्कम भरण्यासाठी व अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सदर योजनेस एक महिन्याची मुदतवाढ. प्रथम टप्पा ३१ जुलै २०१९ रोजी तर द्वितीय टप्पा ३१ ऑगस्ट २०१९ रोजी संपेल, अशी माहिती अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिलीय.