मोदींनी बोलावलेल्या बैठकीकडे उद्धव ठाकरे यांची पाठ

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विविध पक्षीय नेत्यांशी चर्चा केली. यावेळी बैठकीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण होते. परंतु त्यांनी या बैठकीकडे सपशेल पाठ फिरवली. दुसरीकडे ग्रंथालय इमारतीत झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आवर्जून उपस्थित होते. त्याशिवाय सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्लाही उपस्थित होते.
लोकसभा किंवा राज्यसभेत किमान एक खासदार असलेल्या पक्षप्रमुखांना मोदींनी एकत्रित निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीला बोलावले होते. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, डीएमकेचे एमके स्टॅलीन, टीडीपीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीला येणे टाळले.