पोलीस अधीक्षक लोहार यांना जन्मठेप

0Shares

जळगाव – मुंबई होमगार्डचे पोलीस अधीक्षक तथा चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार यांना जळगाव जि.प. च्या माजी सदस्याचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यासोबतच धीरज यशवंत येवले या दोघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. भादंवि कलम 354 (अ) अन्वये दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे…

काय आहे प्रकरण ?

चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना ३० जून २००९ रोजी चाळीसगाव येथे घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या समोर सुनावाणी झाली. खटल्यात १६ साक्षीदारांची साक्ष अतिशय महत्वपूर्ण ठरली. याप्रकरणी बुधवारी न्यायालयाने हा निकाल दिला. या गुन्ह्याचा तपास करुन तत्कालीन सीआयडी अधिकाऱ्यांनी दोषारोप दाखल केले होते. या खटल्यात न्यायाधिश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सरकार पक्षाने एकूण १६ तर बचावपक्षाने दोन साक्षीदार तपासले. सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. पंकज अत्रे व अविनाश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, विनोद चौधरी, महेंद्र पाटील व गणेश सोनवणे यांनी सहकार्य केले.

लोहार…जळगाव…आणि वाद…

मनोज लोहार हे जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशीही त्यांचे अनेक प्रकरणावरून खटके उडाले होते. त्यावरून विधानसभेत खडसे यांनीही तक्रारी करून लोहार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.