खरंच का महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे ?

0Shares

महाराष्ट्राचा इतिहास पाहता अन्य राज्यांच्या तुलनेत विविध चळवळींतून व्यापक समाज हितासाठी अनेक द्रष्ट्यांची फळी उभी राहिली आणि प्रबोधनासाठी समाज ढवळून काढला. वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या मार्गाने समाज मनांचं परिवर्तन केलं. अशातूनच या महाराष्ट्राला महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने एक वेगळी ओळख दिली. या चळवळीत असंख्य विद्वान होते, प्रत्येक जातीतील द्रष्टे होते, त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, सामान्य माणसाचे हक्क, स्त्रियांचे हक्क, जन्माने उच्च-नीच ठरवणे, जाती व्यवस्था, एखाद्या वर्गालाच बहिष्कृत ठरवणे, गुलामी, शोषण, विषमता यावर प्रहार केले, तर शिक्षण, विज्ञानवाद, बुद्धिवाद, विवेकवाद अशा मुल्यांचा त्यांनी प्रचार प्रसार केला. कृतीतून समाजात विचार मंथनच नव्हे तर तसा समाज घडवण्याचा प्रयत्न केला… अशी दिव्य परंपरा या महाराष्ट्राला लाभली. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र म्हणताच एक समीकरण दृढ़ झाले ते म्हणजे-  फुले-शाहू आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र!

मात्र, सद्या काय दिसतंय समाजात. जे हा वारसा सांगतात तेच हा वारसा सांगून समाजात सद्या काय करताहेत. फुटीचे राजकारण हा तर इथल्या राजकारणाचा पाया झालाय. जातीय व्यवस्था नष्ट न होता तिला अधिकाधिक खतपाणी घालून प्रतिगामी विरूद्ध पुरोगामी लढा असल्याचं चित्र जरी दिसत असंल तरीही प्रत्यक्षात जाती व्यवस्था स्थीर राहण्याचा प्रयत्न होतोय का ? याचा विचार कोणी करणार आहे का? स्त्रियांच्या शिक्षणासाठी फुलेंनी सावित्रिबाईंना शिकवलं नंतर सावित्रिबाईंनी मुलींची शाळा सुरू केली… आज स्त्रियांच्या शिक्षणातून समाजाच्या प्रगतीला हातभार लागलाय. एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं हा त्यांचा विचार आज प्रत्यक्षात आलाय. पण आजही आपण पूर्णत: हे स्वीकारलंय का? आज कारणं विविध दिली जात असली तरीही पुन्हा मुलिंच्या बालविवाहाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यात दुष्काळाच्या झळा वाढल्यानं घरात खाणारी तोंडं कशी कमी होतील याचा विचार करून पुन्हा मुलींना शाळेत न पाठवता तिचे हात बाल वयातच पिवळे होऊ लागले आहेत, या बालविवाहाने राज्यातल्या दुष्काळी भागात जोर पकडलाय. घरातल्या दारीद्र्याच्या बळी या कोवळ्या कळ्याच का होतात? बीड सारख्या एखाद्या जिल्ह्यात हे प्रमाण 34 टक्के असल्याची बातमी वाचून मन विष्णण होतं. प्रगती केली, आपण निश्चित प्रगती केली पण त्याचवेळी अनेक धागे समूळ नष्ट न केल्यानं ते कॅन्सर सारखे आजही पुन्हा पुन्हा उभारी घेतात. याच महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण वाढले आहे. सांगली जिल्ह्यात एका ठिकाणी 19 स्त्री गर्भ मातीत पुरलेले आढळले. जे समोर आले त्याची बातमी झाली, पण अशा कितीतरी मातीत कितीतरी कळ्या गाडल्या गेल्या असतील, ज्याची नोंद कोणत्याही सरकारी किंवा खासगी रूग्णालयात नाही की पोलिस ठाण्यात नाही. गर्भलिंग चाचणी ही स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठी असावी असा प्रस्ताव लोकलेखा समितीनं विधान सभेत मांडला. पण यातून गर्भलिंग चिकित्सेचा बाजार मांडणा-यांच्या हाती शस्त्रच दिल्यासारखे होऊ शकते. प्रत्येक कायद्याच्या किंवा कोणत्याही नियमांच्या दोन बाजू आहेत, पण त्याच्या व्यापारीकरणावर, त्याच्या स्वार्थी अतिरेकी वापरावर नियंत्रण ठेवणारी संस्था मजबूत आहे का? हे तपासावे लागेल. त्याच्यात भ्रष्ट लोकांचा सुळसुळाट असेल तर कोणत्याही कायद्याचा मूळ उद्देशच बाजूला पडून त्याचा गैरवापर अधिक प्रमाणात होऊ शकतो. मुलींच्या जन्माचा दर घटला आहे. अलिकडेच राज्य आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर केलीय, त्यात मुलींचा जन्म दर गेल्या वर्षीच्या तुलनेत हजारी आठने कमी झाला आहे. 2015 ला हजार मुलांमागे 907 मुली होत्या, आता 2016 च्या आकडेवारीत हा आकडा 899 वर पोहोचला आहे. शहर असो वा ग्रामीण भाग मुलींची संख्या घटत चालली आहे. भविष्यात हा आकडा किती राहील याचा विचार आजच केलेला बरा. परमेश्वरानं मातृत्त्व हे केवळ स्त्रीलाच दिलेले वरदान आहे, त्यामुळे भविष्यात ज्या वंशाच्या दिव्याला जोपासण्यासाठी आज कळ्या मारताय त्या वंशाचे दिवे कसे जन्माला येणार याचा गांभीर्यांने विचार होण्याची गरज आहे. स्त्रीभूण वाचवण्यासाठी केवळ कागदावर योजना आखून चालणार नाही तर प्रत्यक्षात फुले शाहू आंबेडकरी आणि छ्त्रपती शिवरायांचा वारसा असल्याच्या घोषणा देणा-यांनीही काही विधायक कार्य सतत केलं पाहिजे.

राजकारणात पिछाडिवर जाताच अनेक मंदावलेल्या किंवा बंद पडलेल्या चळवळींना पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार अनेकजण करीत आहेत. राजकीय नफा-तोटा एवढंच उद्दिष्ट अनेकांचे आहे. एवढा संकुचित विचार ना बाबासाहेबांचा होता ना फुले शाहूंचा होता. त्यांना स्वातंत्र्य,समता आणि बंधुता हवी होती. त्यांना जातीजातीत तेढ नको होती. आज पुरोगामीत्वाची व्याख्याच आपण बदलू लागलोय. केवळ प्रतिगामींचा विरोध एवढाच त्या लढ्याचा अर्थ नव्हता. त्यांच्या लढ्यात सर्व जाती धर्मातील लोकं एकत्र आले होते. त्यांचा लढा जाती विरूद्द नव्हे तर त्यातील अनिष्टते विरोधात होता. आम्ही मात्र त्यालाच खतपाणी घालत राहिलो. राज्यातल्या विविध प्रश्नांचे मूळ कशात हेच ओळखले नाही किंवा ओळखूनही त्याकडे दुर्लक्षच केलं. राज्यात कुपोषणाची तरी काय स्थिती आहे. तेही विविध योजना, करोडो रूपये खर्च करूनही कुठे संपलेय. पूर्ण यश नाही तरी किमान दिसण्यासारखे तरी काही आहे का? मागास जिल्ह्यातील आकडेवारी मागिल पानावरून पुढे जाताना त्यात वाढच दिसतेय. आता पुरोगामी महाराष्ट्र असा केवळ आवाज उठवण्या पेक्षा आणि राजकीय फायदा कशात ही गणितं न जुळवता ज्या समाजासाठी ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याच व्यापक समाजहितासाठी पुन्हा एकत्र आलो तरच महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल राहिल असं दिसंय. नैराश्य अजिबात नाहीये, पण शल्य आहे , ज्या क्षमतेचे हे राज्य आहे ते आपली क्षमता, आपली अस्मिता आपला इतिहास आपण आपल्याच कर्माने पुसत तर नाही ना ? हे तपासण्याची गरज आहे.

4 COMMENTS

  1. I simply want to say I am just new to blogging and site-building and certainly savored this blog. Most likely I’m going to bookmark your site . You really have wonderful well written articles. With thanks for sharing your webpage.

  2. Now, I’m a complete newbie (and dummie), so please help – I like a few features from Dynamic Drive, but how EXACTLY to insert them? Where do I go after I login into my Control Panel on Joomla?. I know how to copy-paste, but details? Please? I’m just afraid to delete something necessary and break the whole thing down, as I have never done that before. Any help greatly appreciated, or just give me a link where this is properly explained in Simple English, thanks!.

  3. Do you have a blog? I have a verse blog site. =-RRB- If so, what’s your web link so I can check it out as well as follow you. =-RRB-. I already have one began. =-RRB-.

LEAVE A REPLY

thirteen + fifteen =