आरे कॉलनीतल्या आदिवासींना स्वतःच्याच शेतातले आंबे चोरावे लागतात…

85
0
महानगरी मुंबई सिमेंटच्या जंगलात रूपांतरित होतांना जे काही हरित पट्टे शिल्लक आहेत. त्यांचीही कत्तल विकासकामांच्या नावाखाली सुरू झालीय. मेट्रोच्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्वच्या आरे कॉलनीचाही अशाच प्रकारे बळी देण्यात येतोय. कित्येक पिढ्यांपासून इथं शेती करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबं अक्षरशः उध्वस्त झालेली आहेत. याच कारशेडसाठी मुंबईत पर्यायी जागा उपलब्ध असतांना आरे कॉलनीतच कारशेडचा अट्टाहास का, असा प्रश्न उपस्थित होतो. मेट्रोसाठी इथल्या आदिवासींनी जमीन दिली खरी मात्र त्यांच्या जगण्याचं साधन असलेली शेतीही या प्रकल्पात गेली. त्यामुळं जगावं कसं हा प्रश्न आदिवासींसमोर निर्माण झाला आहे.
पुनर्वसनानं आदिवासींच्या अडचणींत वाढ
गोरेगाव पूर्व इथं आरे कॉलनी आहे. कुलाबा-बांद्रा-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतल्या प्रजापूर पाडा इथल्या आदिवासींची ३३ एकर जागा संपादित करण्यात आली आहे. यात आदिवासींची घरं आणि त्यांची शेतीही गेलेली आहे. आदिवासींच्या कित्येक पिढ्या याच कॉलनीत वाढल्या. भाजीपाला पिकवून आदिवासी आपला उदरनिर्वाह करायचे. आता त्याच जागा मेट्रोसाठी संपादित केल्यानंतर आदिवासींना शेतीसाठी पर्यायी जागाच देण्यात आलेली नाही, त्यामुळं उदरनिर्वाहासाठी करायचं काय, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त रमेश खारवी विचारतात.
मेट्रो कारशेडसाठी सध्या आरे कॉलनीत कामं सुरू झालीत. या कामांमुळं कॉलनीतल्या पर्यावरणावर परिणाम होऊ प्रदुषण वाढत असल्याची तक्रार अनिल प्रसाद या प्रकल्पग्रस्तानं केलीय.
कारशेडमुळं इथलं गावपणच गेल्याची खंतही स्थानिक व्यक्त करतात. कारशेडमुळं मोठ्या प्रमाणावर आरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल करण्यात आली. याविरोधातही पर्यावरण प्रेमींनी सोशल मीडियावर मोहीम राबवली, शिवाय तक्रारीही केल्या. मात्र, कत्तल काही थांबलीच नाही. तर दुसरीकडे पिढ्यानं पिढ्या स्वतःच्या आंब्याच्या बागेतच आता चोरून आंबे तोडावे लागत असल्याचं गणेश गोतपागर या तरूणानं सांगितलं.
प्रकल्पग्रस्तांना पुर्नवसनाच्या ठिकाणीही अडचणी
प्रजापूर पाडा इथं दीडशे कुटुंब राहायची. त्यांचं पुनर्वसन अंधेरीतल्या चकाला आणि कांजुरमार्ग इथं झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घरांमध्ये करण्यात आलंय. तिथंही या प्रकल्पग्रस्तांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावं लागतं. असल्याची तक्रार सुनीत मसुरकर या प्रकल्पग्रस्तानं केलीय. पुनर्वसन केलेल्या वसाहतींमध्ये वीज बील मोठ्याप्रमाणावर येतंय, शिवाय सोसायटीचा मेन्टेनन्सही परवडत नसल्याची तक्रार मुसरकर करतात…
कसं जगायचं तुम्हीच सांगा…
किशन भोये आणि आशा भोये यांची १९ गुंठे जागा होती. त्यात भाजीपाल्याची लागवड करून मिळणाऱ्या उत्पन्नावर भोये कुटुंबियांचा उदरनिर्वाह व्हायचा. याशिवाय त्यांच्या शेतातील ६० पैकी १५ झाडंही एमएमआरसीएलनं (Mumbai Metro Railway Corporation Limited) कापून टाकली. शिवाय भोये यांचं एक छोटंस दुकानंही होतं, तेही या प्रकल्पात पाडून टाकण्यात आलंय. पुर्नवसनात एमएमआरसीएलनं त्यांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी दुकान दिलं पण तिथं ग्राहक येतील का, असा प्रश्न भोये कुटुंबियांना पडलाय. आशा भोये या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात, त्यासाठी त्यांना ३ हजार रूपयांचं मानधन मिळतं, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भोये यांच्या कुटुंबात सासू-सासरे, मुलगा-मुलगी आणि स्वतः भोये दांपत्य असं सहा सदस्यांचं कुटुंब इतक्या अल्प उत्पन्नात जगवायचं कसं, असा प्रश्न उपस्थित होतो. भोये कुटुंब हे इथल्या प्रकल्पग्रस्तांचं प्रतिनिधीक स्वरूप आहे.
बळाचा वापर करून आदिवासींना बाहेर काढलं
मेट्रो कारशेडसाठी जमिनी द्यायला आदिवासींचा विरोध होता. मात्र, आदिवासींचं म्हणणं लक्षात न घेता त्यांना पोलिसी बळाचा वापर करून अक्षरशः घरातून बाहेर काढण्यात आलं, असं संगीता गायकवाड यांनी सांगितलं.
ज्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं तिथल्या वातावरणाशी अजूनही प्रकल्पग्रस्त एकरूप झालेले नाहीत. आरे कॉलनीतली जागा संपादित करतांना आदिवासींना प्रकल्पाविषयी, जमीन संपादनाविषयी व्यवस्थित माहितीच देण्यात आली नाही, असा आरोप लक्ष्मी गायकवाड यांनी केलाय.
प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू झाली सोशल मीडियावर चळवळ
अशिक्षित आदिवासींवर पुनर्वसनाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काही नेटिझन्सनी #SaveAareyForest अशा हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम सुरू करण्यात आली.
नोव्हेंबर २०१४ मध्ये Save the Aarey ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहीमेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञांची समिती तयार केली. या समितीमधल्या पर्यावरण अभ्यासकांनी आरे कॉलनीतली जागा ही कारशेडसाठी अनुकूल नसल्याचं सांगितलं. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचं Save The Aarey या मोहीमेच्या अमृता भट्टाचार्य यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.
याच कमिटीनं कांजूरमार्ग, बॅकबे, कलिना (सांताक्रुझ) इथं कारशेडसाठी पर्यायी जागा सूचवली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचं भट्टाचार्य यांनी सांगितलं. आरे कॉलनीत मेट्रोचं कारशेड उभारण्याबाबत सविस्तर अभ्यासच करण्यात आला नसल्याचा गंभीर आरोपही अमृता भट्टाचार्य यांनी केलाय.
आरे कॉलनीतलं जंगल सपाट करून त्यात भराव टाकून मेट्रोच्या कारशेडचं काम सुरू आहे. त्यामुळं येत्या पावसाळ्यात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाणी साचण्याची भीती व्यक्त होतेय. शिवाय याच ठिकाणी मेट्रो भवनही उभारलं जाण्याची चर्चा होतेय, त्यामुळं मुंबईतलं उरलंसुरलं जंगलही नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जातेय.