Home > News Update > उद्धरली कोटी कुळे, भिमातुझ्या जन्मामुळे!

उद्धरली कोटी कुळे, भिमातुझ्या जन्मामुळे!

महापरिनिर्वाण दिनी उद्धारकर्त्या महामानवाला अभिवादनासाठी रायगड जिल्ह्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीकडे रवाना, ठिकठिकाणी प्रबोधनात्मक, लोकाभिमुख उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन....

उद्धरली कोटी कुळे, भिमातुझ्या जन्मामुळे!
X

महापरिनिर्वाण दिनी उद्धारकर्त्या महामानवाला अभिवादनासाठी रायगड जिल्ह्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीकडे रवाना, ठिकठिकाणी प्रबोधनात्मक, लोकाभिमुख उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन....

उद्धरली कोटी कुळे , भीमा तुझ्या जन्मामुळे, घेतो तो श्वास अन खातो तो घास बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे , अशी कृतज्ञता व्यक्त करीत 6 डिसेंबर रोजी राज्य व देशभरातील लाखों अनुयायी चैत्यभूमी दादर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. कोरोनाच्या पाश्वभूमीवर दोन वर्षे महामानवाला घरूनच अभिवादन करावे लागले, मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने पाणावलेल्या डोळ्यांनी भिमानुयायी बहुजन बांधव मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर अभिवादनासाठी निघाले. पाली सुधागडसह जिल्ह्यातील विविध भागातील अनुयायी दि.(5) व दि.(06 )डिसेंबर दिवशी महामानवाच्या चरणी नतमस्तक होताना दिसू लागले.ठिकठिकाणी महामानवाला अभिप्रेत असे प्रबोधनात्मक, लोकाभिमुख उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय विकासाचे शिलेदार , मानबिंदू आहेत. त्यांचे विचार व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक कार्य आजच्या शासन कर्त्यांना प्रेरणादायी आहेत.

ब्रिटिशांनी भारत देश सोडला आणि 15 ऑगस्ट रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांत 395 कलमे आणि 8 परिशिष्टे अशी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले संविधान भारत देशाला अर्पण केले. आणि 26 जानेवारी 1950 पासून देशात प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. भारतीय संविधानाप्रमाणे देशाची वाटचाल सुरू झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून या देशाची विस्कटलेली घडी व्यवस्थित केली. एकवेळ स्वतंत्र मिळवणे सोपे पण ते भारतासारख्या गरम रक्ताच्या देशात टिकवणे फार महत्वाचे होते. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकृतीची पर्वा न करता देश कार्याला वाहून घेतले. त्यांनी परकीयांचा गुलाम बनलेल्या देशाला संविधान कलम 1 अन्वये भारत किंवा इंडिया असा नामोल्लेख करून देशाला गतकालीन वैभव प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र, समता, बंधुता व लोकशाहीच्या मुलभूत तत्वप्रणालीवर आधारलेली विज्ञाननिष्ठ राज्यघटना बहाल केली. जगातील सार्वभम्य लोकशाहीने नटलेल्या या खंडप्राय देशाला एकसंघ ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. मात्र आज संविधान धोक्यात आहे. संविधानाच्या रक्षणासाठी देशवासीयांनी मतभेद विसरुन एकत्रीतपणे संविधान बचावासाठी व्यापक स्वरुपाचा लढा उभारण्याची गरज आहे. अखंड भारत देशातील सामाजिक विषमता नष्ट करुन एक धष्टपुष्ठ, समृध्द व प्रबुध्द भारताच्या निर्मीतीत डॉ. बाबासाहेबांनी अमृततुल्य योगदान दिले. त्यांचे कार्य कोणत्याही एका जातीधर्मापुते मर्यादीत नव्हते तर त्यांचा जीवन संघर्ष राष्ट्रहित व मानवीउत्कर्षासाठीच होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1942/1946 मध्ये मजूर , ऊर्जा,पाटबंधारे मंत्री असताना कामगार, शेतकरी, उद्योजक , स्त्रिया यांच्याविषयी फार मोलाचे कार्य केले. त्यांनी बहुउद्देशीय प्रकल्प देशात उभारून विकासाचा पायंडा पाडला. तसेच त्यांनी जातीवर आधारीत मनुस्मृतीने निर्माण केलेली व्यवस्था मोडीत काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांतीभुमीत 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीची जाहीरित्या होळी केली. व सामाजिक समता प्रस्थापीत केली.

माणसाला माणसासारखे सन्मानाने स्वाभिमानाने जगता यावे , प्रत्येकाला मानवी हक्क अधिकार मिळावेत याकरीता 20 मार्च 1927 रोजी त्यांनी महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याची ऐतिंहासिक क्रांती केली. त्यांच्या महान कार्याचा गौरव जागतीक स्तरावर होत आहे. राज्य व देशभरातील महिला, भिमअनुयायी व बहुजनबांधवांनी हजारोंच्या संख्येने महाडच्या क्रांतीभुमीत उपस्थीत राहण्याचे आवाहन आनंदराज आंबेडकर व राजरत्न आंबेडकर केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनार्वाणदिन असून आपल्या उध्दारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी येणार्‍या लाखो अनुयायांनी दरवर्षीप्रमाणे शिस्तबध्द व विनम्रपणे येवून अभिवादन करावे तसेच महापुरुषांचे कार्य व विचारधारा अधिक प्रसारीत करण्याकरीता ग्रंथ खरेदी करुन वाचन करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या महान संदेशाचे अनुकरण करुन ग्रथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतीतून अभिवादन करावे. असे आवाहन आंबेडकरी बहुजन नेत्यांनी केले.

Updated : 5 Dec 2021 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top