Home > News Update > संपत्तीच्या वादातून माजी मंत्र्याच्या नातवाचा अंदाधुंद गोळीबार

संपत्तीच्या वादातून माजी मंत्र्याच्या नातवाचा अंदाधुंद गोळीबार

संपत्तीच्या वादातून माजी मंत्र्याच्या नातवाचा अंदाधुंद गोळीबार
X

कोल्हापूर : माजी कृषी मंत्र्याच्या नातवाने शैक्षणिक संस्था आणि शेतीच्या मालकीवरून चुलत भावाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रंकाळा तलावर परिसरातून समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर टाकल्याने ही घटना समोर आली.

माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक आणि मानसिंग यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद आहे. अभिषेक हा सुभाष बोंद्रे यांचा मुलगा असून मानसिंग हा विजय बोंद्रे यांचा मुलगा आहे. हे दोघेही रंकाळा तलावाच्या मागील बाजूला अंबाई टँक परिसरमध्ये स्वतंत्र राहतात. दोघांमध्ये श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि जमिनीच्या कारणावरून वाद आहे. संपत्ती आणि मालकीवरून कोर्टात दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत. याच कारणावरून काल सोमवारी रात्री साडेबारा वाजता मानसिंग बोंद्रे याने अभिषेक बोंद्रे यांच्या घराजवळ जात 'तुला व तुझ्या खानदानाला संपवितो, तुझा गेम करतो' अशी धमकी देत पिस्तुल काढले. त्यातून त्याने चार फायर केले. गोळीबाराची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर टाकल्याने या घटनेला तोंड फुटले. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अभिषेक बोंद्रे यांनी मानसिंग याच्या विरोधात फिर्याद दिली.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मानसिंग बोंद्रे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बोंद्रे हे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Updated : 14 Dec 2021 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top