Home > मॅक्स रिपोर्ट > निरज गुंडे `किरीट सोमय्या` ठरु शकतात का?

निरज गुंडे `किरीट सोमय्या` ठरु शकतात का?

सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपनं आणखी एक आघाडी उघडली आहे. ईडी, एनसीबी, आयकर विभागानंतर

समाजमाध्यमातून देखील एक आघाडी कार्यरत आहे. निरज गुंडे असं एक नाव. कारवाईच्या आधी जशी किरीट सोमय्या भेट देऊन घोषणा करतात. तशी नाही परंतू ट्विटरच्या माध्यमातून आघाडी सरकारविरोधात कागदपत्रांसह केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना टॅग करुन खळबळ उडवून देणारे निरज गुंडे नेमके कोण आहेत? `मातोश्री` साठी जवळ असणाऱ्या गुंडेंचा इतिहास काय आहे? यांच्या बाबतीत आघाडी सरकारला सॉफ्टकॉर्नर आहे का? येत्या काळात निरज गुंडे `किरीट सोमय्या` ठरु शकतात का? या सत्ताकारणाभोवती वलयांकित असलेल्या निरज गुंडेवरील विशेष रिपोर्ट....

भाजप आणि शिवसेना आता एकमेकांपासून दुरावली असली तर नैसर्गिक हिंदुत्वाच्या विचारधारेवर एकत्र असणारे दोन्ही पक्ष ३० वर्षे एकत्र नांदत होते.अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना सत्तेत आणि युतीत मोठाच भाऊ राहीला होता. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या मधील दुवा म्हणुन कधी काळी प्रमोद महाजनांनी काम केलं होतं. २०१३ मधे उध्दव ठाकरेंनी शिवसेनेचं अध्यक्षपद स्विकारलं.

२०१४ च्या सत्ताकारणात जागावाटपा सत्तेचा सारीपाट उभारण्यापर्यंत भाजप आणि मातोश्रीमधे एक दुवा काम करत होता. चेंबूरचे अभियंता असलेले निरज गुंडे हे सेना-भाजपमधील दुवा होते. ठाकरे- फडणवीस भेटीचे सुत्रधार ते जागावाटप आणि सत्तास्थापनेपर्यंत गुंडेंचा सहभाग होता असे सांगितले जाते.

मातोश्रीशी जवळीक असलेले निरज गु्ंडेंना मातोश्रीवर थेट प्रवेश होता.

राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून शांत असलेले नीरज गुंडे आता ट्विटरच्या माध्यमातून अॅक्टीव झाले आहेत. महाविकास आघाडीला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक बाबीवर ते भाष्य करत असतात. शिवसेना वगळून राष्ट्रवादीला अधिक टार्गेट केल्याचे त्यांच्या ट्विटर थ्रेडमधून दिसून येतं.

मुंबईतील चेंबूर परीसरात राहणारे निरज गुंडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यामधे मोठ्या पदांवर कामाचा अनुभव असलेल्या गुंडेंचा सध्या केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही उठबस असते.

बीएमडब्ल्यूचे मालक ते यशस्वी व्यवसाय आणि अनेक कॉर्पोरेट्सचे ते सल्लागार आहे. गुंडे हे शिक्षणाने अभियंते असले तरी व्यवसायाने उद्योजक आहेत, पण त्यांच्या स्वतःच्या शब्दात, "भ्रष्टाचाराविरोधातील धर्मयुद्ध" अग्रेसर असणं त्यांना आवडतं.

ते म्हणतात, "मी फक्त त्यांच्यामागे लागतो जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत आणि ज्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरेसे पुरावे आणि कागदपत्रे आहेत."राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मजबूत राजकीय संबंध आणि खोल मुळे असूनही, गुंडे कुटुंब नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले आहे, विशेषत: माध्यमांपासून.

मॅक्स महाराष्ट्राने निरज गुंडेशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी या सर्व राजकीय गोष्टींवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ``मी एक स्वतंत्र व्हिसल ब्लोअर आहे. मला जे व्यक्त व्हायचे ते मी समाजमाध्यमातून व्यक्त होतो. माध्यमांशी मी कधीच बोलत नाही. बोलले तर त्या गोष्टी ट्विस्ट होतात. मग तु्म्हाल कॅटगराईज्ड केलं जातं.

काही लोक माहीतीचा गैरफायदाही घेतात, असं गुंडे म्हणाले.``

गुंडेचा वावर नेहमीच हायप्रोफाईल वर्तुळात असतो. गुंडे शेवटच्या वेळी प्रकाशझोतात आले होते ते वर्ष होतं 2015. ललित मोदींच्या गैरवर्तनादरम्यान आणि जेव्हा बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अनुराग ठाकूर आणि कथित बुकींसह छायाचित्रे समोर आली होती. ठाकूर यांनी तेव्हा आरोप केला होता की गुंडे हे लीकच्या मागे होते आणि ते माजी बोर्ड अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या सांगण्यावरून बदनामी करत आहेत. ठाकूरच्या आरोपानं गुंडे अस्वस्थ होते.

त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन हे प्रकरण थंड केल्याचे सांगितले जाते. सीट वाटपावरून मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्यात नीरज हा महत्त्वाचा संदेशवाहक असल्याबाबतत्यांच्या निकटवर्तीयांना त्यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मला नीरज गुंडेंबाबत जास्त माहीत नाही. पण निरजचा स्वभाव असा आहे की जे काही काम सोपवले जाते, ते ते शांतपणे पूर्ण करतात."

भाजपमधील वादग्रस्त नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी निरज गुंडेंचे घनिष्ठ संबध आहेत. युपीए सत्तेत असताना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासोबत विमान आणि 4G सह अनेक मुद्द्यांवर काम केले आहे.

कालच पुणे, ठाणे आणि मुंबईतील सुमारे ४० महत्वाच्या बांधकाम तसेच बड्या व्यावसायिकांवर आयकर खात्याने छापे टाकले आहेत.महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांच्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली आहे. प्राप्ती, मिळकत, आवक आणि जमा झालेला काळा पैसा यात प्रचंड तफावत आढळून आली आहे असे समजते.आयकर कायद्याच्या या विशिष्ट कलमाअंतर्गत ही कारवाई प्रथमच करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सन २००० मध्ये या प्रतिष्ठानांच्या गैरव्यवहाराची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली होती. या संबंधीचे ट्वीट ज्येष्ठ नेते डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांचे निकटवर्तीय मुंबईस्थित नीरज गुंडे यांनी केले आहे.

सध्या मुंबईत अभिनेत शाहरुख खान यांचे पुत्र आर्यन खान यांच्यावर एनसीबीकडून कारवाईच्या बातम्या येत आहेत. आर्यन खान अटक करताच नीरव गुंडे यांनी २०२० चे त्यांचे ट्विट रिट्विट करत मन्नत या शाहरुख खानच्या घरी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत ड्रगचा वापर होत असल्याची आठवण करुन दिली आहे.

तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती देखील क्रुझ पार्टीमधे सहभागी असल्याचे गुंडे वारंवार सांगत आहेत.

निरज गुंडेंच्या ट्विटमधे हाय प्रोफाईल व्यक्तींना टॅग केले जाते. यामधे सर्वाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना टॅग केल्याचं दिसत. त्यापाठोपाठ विषयानुरुन केंद्रीय मंत्री निर्मला सिताराम तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनाही टॅग केल्याचं दिसत आहे.

शिवसेना मंत्र्यावर जास्त नाही परंतू राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर पुराव्यासह अनेक आरोप निरज गुंडेंनी केले आहे. यामधे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या निरज गुंडेंच्या हिटलिस्टवर आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी मध्यंतरी निरज गुंडे यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान रश्मी शुक्ला यांचा कथित अहवाल नीरज गुंडे या व्यक्तीने ट्विट केला होता. हा गुंडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा बंगल्यावर, तत्कालीन पोलीस आयुक्त, तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त यांच्या दालनात सतत जात होता. हा व्यक्ती कोण आहे? त्याचे आणि फडणवीस यांचे संबंध काय आहेत? सगळ्यात आधी या व्यक्तीने अहवाल कसा मिळविला व ट्विट केला? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असे थेट आव्हान अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले होते. शुक्ला यांनी माफी मागितली होती.मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी विस्तृत अहवाल दिला आहे. अहवालात रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची येऊन माफी मागितली, त्यांच्या परिवारातील अडचणी सांगितल्यामुळे सहानुभूती म्हणून त्यांच्यावर कारवाई केली नव्हती, हे देखील अहवालात नमूद आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा डीव्हीआर गायब झाला असून, एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या १८ दिवसांपासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल तर राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची बोलणी होण्यासाठी नीरज गुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती पुन्हा सांधण्यासाठी नीरज गुंडे हे शिवसेना आणि भाजपमधला दुवा ठरले होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपाध्यक्ष अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याची घोषणा केली होती. या युतीमागे नीरज गुंडे यांचा सिंहाचा वाटा मानला जातो.

गुंडे हे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या जवळचे व त्यांच्या प्रत्येक कामात ते सहभागी होत आले आहेत. स्वामी पहिल्यांदा मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत नीरज गुंडेही होते. ही त्यांची मातोश्रीवरील पहिली भेट. त्यानंतर ते अनेक वेळा मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुंडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व त्यांच्या कामाचे स्वरूप बघून जवळ केले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी मुंबईतील महापौर निवास हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रमात नीरज गुंडे महापौर बंगल्यावर उपस्थित होते. त्या वेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात चर्चा झाली तेव्हा फक्त गुंडेच उपस्थित होते, असे सांगितले जाते.

एकंदरीत सध्या महाविकास आघाडी मागे हात धुवून लागलेले नीरज गुंडे भाजप-सेनेतील दुवा असल्याचे स्पष्ट आहे. त्यांची सध्याची भुमिका भाजप आणि शिवसेनेसाठी पुरक आहे. भविष्यात राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे माहीत नाही. परंतू सध्याच्या एनसीबी, ईडी आणि आयटीच्या कारवाईवरुन सत्तेच्या समांतर काही लोक भाजपला मदत करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निरज गुंडे स्वतःला भ्रष्टाचार विरोधातील क्रुसेडर व्हिसल ब्लोअर म्हणवत असले तरी त्यांचे भाजप आणि संघप्रेम लपून राहलेले नाही. भविष्यात ते भाजपचे `किरीट-सोमय्या` होतील का? या प्रश्नाला स्वतः निरज गुंडे यांनी स्पष्ट शब्दात हसत हसत उत्तर टाळले आहे.

Updated : 11 Oct 2021 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top