Home > मॅक्स रिपोर्ट > गडचिरोलीत साजरा झाला "दारुमुक्त पोळा"

गडचिरोलीत साजरा झाला "दारुमुक्त पोळा"

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘दारुमुक्त पोळा’ साजरा करण्यात आला आहे. नक्की कसा पार पडला दारुमुक्त पोळा वाचा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा लेख

गडचिरोलीत साजरा झाला दारुमुक्त पोळा
X

बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक साजरा करतात. या दिवशी बैलाला अंघोळ घालण्यात येते. त्याची शिंगे रंगवली जातात. त्याचे खांदे तेलाने चोळण्यात येतात. त्याच्या पाठीवर झुल चढवली जाते. त्याला गोड धोड नैवेद्य दिला जातो.

पूजा करून पारंपारिक वाद्यांच्या तालावर त्याची गावातून मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची देखील पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजी यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. बैल वर्षभर शेतात कष्ट करतो. शेतीच्या उत्पन्नात त्याचा मोठा वाटा असतो. त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. ही आहे बैल पोळ्याची सांस्कृतिक ओळख.


पण या सणाला गडचिरोली आणि परिसरात मात्र, दारूची परंपरा चिकटलेली आहे. या उत्साहाच्या सणात दारू पिणाऱ्या पुरुषांच्या घरातील स्त्रिया या आनंदाच्या दिवशी देखील निराशेत असायच्या. पोळ्याच्या सणाला दारू आणि जुगार ही परंपरा निर्माण झाली आहे. मद्यपी दारूच्या नशेत सणाचे पावित्र्य भंग करीत असतात. या दिवशी घरगुती हिंसाचाराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात होत असायच्या.

पोळ्याच्या सणाला अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू काढली आणि प्राशन केली जाते. जिल्ह्यात गावसंघटनांनी बंद केलेली अनेक दिवसांपासून बंद ठेवलेली दारू पोळ्याच्या निमित्याने पुन्हा सुरु होण्याची शक्यता असते. यामुळे सणाच्या उत्सवावर विरजण पडत असते.

महिलांना दारूमुळे त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे गावातील शांतता भंग होऊन वातावरण खराब होते. या सर्व कारणांमुळे गावातील महिला कार्यकर्त्या या दिवशी दारूबंदीसाठी रॅली अहिंसक कृती करत असायच्या. त्यांच्या या कृतीला संपूर्ण जिल्ह्यात दारुमुक्त पोळा हे सामूहिक स्वरूप आले. यामध्ये यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील तब्बल ११० गावांनी आपला सहभाग नोंदवला.

या सणातील या चुकीच्या परंपरेवर मुक्तीपथ या अभियानाच्या माध्यमातून दारुमुक्त पोळा साजरा करण्याचे आवाहन प्रतिवर्षी करण्यात येते. या अभियानाला यावर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.



'दारूमुक्त पोळा' हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात राबविला गेला. गाव संघटनेच्या पुढाकारातून विविध तालुक्यातील विविध गावांमध्ये दारूमुक्त पोळ्याची अंमलबजावणीही आली. त्या स्त्युत्य उपक्रमामुळे दारू विक्री बंद असलेल्या गावांतील दारूबंदी कायम राहिली, हे विशेष.

गावागावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात यावा, यासाठी मुक्तिपथ तालुका चमूतर्फे गावागावात बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विविध ठिकाणी दारूचे दुष्परिणाम पटवून देत दारूमुक्त पोळा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर या आवाहनाला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला. दारूच्या दुष्परिणामांची जनजागृती करणारे बॅनर लावण्यात आले. या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.

यावर्षीच्या पोळा सणाला जिल्ह्याभरातील ११० गावांमध्ये दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमात पुरुषांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. दरवर्षी दारूच्या नशेत झुलणारे मद्यापी यावर्षी गावात दारू न मिळाल्याने शांत होते. हा सण शांततेत पार पडला. प्रतिवर्षी या सणाला असणारे दारूचे प्रमाण कमी होत आहे. हा सकारात्मक सांस्कृतिक बदल लोकांच्या सहभागातून होत आहे. या अभियानात वडसा तालुक्यातील ६, आरमोरी १०, कुरखेडा १२, कोरची १०, धानोरा १२, गडचिरोली १२, चामोर्शी १४, मुलचेरा १२, एटापल्ली ७,भामरागड ४, अहेरी ११ गावांचा समावेश आहे.



गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ हे अभियान सुरू आहे. जगातील प्रथम दहा मृत्यूच्या कारणांमध्ये दारू आणि तंबाखूचा समावेश होतो. त्यामुळे याचा वापर कमी करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. दारूमुळे आर्थिक हानी होते. या व्यसनांवर लोक आपले पैसे वाया घालवतात. यातून प्रत्यक्ष आर्थिक हानी होतेच परंतु यामुळे बीपी, शुगर, लकवा मारणे मावा खाल्ल्याने तोंडाचे आजार, सब म्युकस फायब्रोसिस सारखे कॅन्सर चे आजार होतात. याच्या उपचारासाठी देखील मोठी आर्थिक हानी होते.

या अभियानाच्या माध्यमातून पोलीस आणि इतर प्रशासनाच्या मदतीने दारूचा पुरवठा कमी करणे.

लोकांची जनजागृती करून दारू तंबाखूचा वापर कमी करणे.

व्यसनी रुग्णांवर उपचार करणे...

या गोष्टींवर काम केले जात आहे. आजपर्यंत या अंतर्गत हजारो लोकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून सण उत्सव आणि परंपरा यामध्ये असलेली दारूची आणि इतर व्यसनांची परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दारुमुक्त पोळा हे अभियान जिल्हाभर राबवले जाते.




आदिवासी परंपरांमध्ये दारूचा उपयोग होत असतो. तेरवी, करसाल, लग्न या कार्यक्रमात दारूचा अमर्याद वापर केला जातो. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केल्यानंतर अनेक गावात दारुमुक्त करसाळ, दारुमुक्त लग्न तसेच इतर सणांमध्ये होत असलेला दारूचा वापर कमी झाला आहे. विशेष म्हणजे यासाठी अनेक आदिवासी गावानी पुढाकार घेतला आहे.

या जिल्ह्यात या अगोदर दारुमुक्त निवडणुका घेण्यात आला. यामध्ये दारूचा वापर करणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन महिला संघटनेतील कार्यकर्त्यांनी केले होते. याला जिल्ह्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांनी चांगला प्रतिसाद देत हमीपत्र लिहून दिले होते.

आनंदाची उत्साहाची मांदियाळी असलेला पोळा हा सण दारूच्या परंपरेमुळे बदनाम झाला होता. या चुकीच्या परंपरेला 110 गावांनी केलेला विरोध हे दिलासादायक चित्र असून येत्या काळात या सणादिवशी सुरू असलेली दारूची परंपरा कमी होऊन कायमची नष्ट होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

Updated : 11 Sep 2021 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top