Home > Max Political > रायगडात भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

रायगडात भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

रायगडात भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर
X

रायगड : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीची टक्कर होणार आहे. 2024 च्या निवडणुकीची रणनीती मोठ्या खुबीने, चातुर्याने आखली जातेय. साम, दाम, दंड , भेद चा वापर करून संघटनात्मक ताकतवान आणि बोलक्या वजनदार नेत्यांची शक्ती आपापल्या गोटात घेण्याची रस्सीखेच सुरू आहे. अबकी बार 400 पार चा नारा बीजेपी ने लोकसभा महासंकल्प विजयी मेळाव्यातून लावला आहे. बीजेपी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मनसुबा आखत आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि नव्याने राज ठाकरेंची मनसे यांच्या महायुतीला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवरीच्या मुद्द्यावर महायुतीत अनेक ठिकाणी मतभेद उघड झालेत. रायगड आणि मावळ लोकसभेच्या उमेदवारीबाबत ही पेच दिसून येत आहे. रायगड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतीतील भाजप जिल्हाध्यक्ष , माजी आमदार धैर्यशील पाटील हे देखील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेऊन जनमत तयार करीत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाने देखील रायगडात आमची संघटन शक्ती अधिक असल्याचे सांगत लोकसभा उमेदवारी आम्हाला मिळावी म्हणून दंड थोपटले आहेत. रायगडात भाजप- शिवसेना (शिंदे) -राष्ट्रवादी (अजित पवार)महायुतीत ऑल इज नॉट वेल ची परिस्थिती पहावयास मिळत आहे.

त्यामुळे महायुतीमधील तिरंगी सामन्यात महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते वनसाईड बाजी मारतील का? अशीही शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

सुनिल तटकरे यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर

राजकारणात अस म्हटलं जातं की एकाच वेळी सर्वांना अंगावर घेतल की शंभर टक्के कार्यक्रम होतो. आपल्या राजकीय कारकीर्दीत वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळे डावपेच करताना अनेकांशी वैर निर्माण होणे साहजिकच आहे.तशीच परिस्थिती रायगडच्या राजकारणात तटकरे यांच्या विषयी दिसून येते. सुनिल तटकरे यांचे सध्या शेकापशी बिनसले आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सुनिल तटकरे यांच्या विरोधात दंड थोपटून आहेत. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही तटकरे उमेदवार असतील तर त्यांचा पराभव करण्यासाठी ताकतीने रणांगणात उतरली आहे. सुनिल तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झाल्याने पवार राष्ट्रवादी ही सुनिल तटकरे यांचे नामोहरण करण्यासाठी सरसावली असल्याचे दिसते आहे. आता सुनिल तटकरे यांच्यासमोर नव्याने शिवसेना शिंदे गटाचे देखील आव्हान उभे ठाकले असल्याचे समोर आले आहे. शिवसेना देखील आपला लोकसभा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. वरिष्ठ आदेश याचीच प्रतीक्षा शिंदे शिवसेना पाहत आहे. भाजप युतीत सामील झाल्याने आजवर राष्ट्रवादीकडे असलेल्या फिक्स मुस्लिम वोट बँक, बहुजन मतांची विभागणी होऊन मतांची टक्केवारी घसरणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे सुनिल तटकरे यांच्यापुढे लोकसभा निवडणुकीत आव्हानांचा डोंगर उभा आहे. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या मावळ आणि रायगड लोकसभा निवडणूक शिवसेना जिल्हा कार्यकारणी आढावा बैठकीत सुनिल तटकरे यांच्यावरील रोष आणि नाराजी उफाळून आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी तसेच आमदारांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या राजकीय खेळी, डावपेच आणि कार्यपध्दतीचे वर्णन करताना नव्या राजकीय घडामोडीत आता आपली फसवणूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी च लागेल असे अनेकांनी स्पष्ट सांगितले.

भाजप आणि शिंदे शिवसेनेची सुनिल तटकरेंवर उघड नाराजी

शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या धैर्यशील पाटील यांना 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली जाईल असे आश्वाशीत केल्याने पाटील भाजपवाशी झाले. मात्र नव्याने झालेल्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपा युतीत संलग्न झाला. आणि विद्यमान खासदार सुनिल तटकरे रायगड लोकसभेवर दावा करू लागले. रायगडात अजित पवार यांनी ही तुमच्या मनातला च उमेदवार असेल कामाला लागा म्हणून कार्यकर्त्यांना सलाईन लावले. तर धैर्यशील पाटील यांचे कार्यकर्तेही रायगड का खासदार कैसा हो धैर्यशील पाटील जैसा हो चे नारे लावू लागले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जणू अलिबागेत धैर्यशील पाटील यांच्या प्रचाराची सभा घेत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात धुसपुस सुरू असताना शिंदे शिवसेनेने ही गुरगुरायला सुरवात केली, आता शिवसेनेने तटकरे यांच्या विरोधात डरकाळी देखील फोडली आहे.

आमदार पुत्र विकास भरत गोगावले उठवणार रान

सुनिल तटकरे यांच्या विरोधात आमदार पुत्र विकास भरत गोगावले यांनी उघड उघड रोष व्यक्त केला. सुनिल तटकरे यांच्या घरात खासदार, आमदार, मंत्री ही पदे आहेत. सर्व पदे एकाच घरात , मग आपण गोट्या खेळायच्या का? असा सवाल गोगावले यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर दहा मिनिटांची बैठक घेऊन सुनिल तटकरे यांनी पुढील निवडणुकांची गॅरंटी देण्याची भूमिका स्पष्ट व्हावी अशी मागणी केली गेली. अलिबाग आणि कर्जत खालापूर मध्ये अपक्ष उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना विधानसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची माळ दळवी यांच्या गळ्यात पडणार होती, पण गळा कापण्याचे काम कसे झाले हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन गॅरंटी घ्यावी, तिन्ही आमदारांनी नेहमी त्याग का करावा , मंत्रिपद , पालकमंत्री पदाचा आपण त्याग केला, ही परिस्थिती आता बदलली पाहिजे. गणपती शपथ घेऊन सांगतो शेकाप वाल्यांचे फोन आले , तुम्ही भूमिका घ्या आमचा पाठिंबा आहे. सुनिल तटकरे यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा त्यांचा बळी गेला आहे, त्यामुळे आम्हाला गॅरंटी असेल तरच आम्ही काम करू नाहीतर आम्ही सुनिल तटकरे यांच्या विरोधात येत्या आठ दिवसात रान उठवू असा इशारा दिला.

मोदी गॅरंटी प्रमाणे सुनिल तटकरेंची गॅरंटी कोण घेणार - महेंद्र थोरवे

देशात अनेक ऐतिहासिक आणि विकासात्मक निर्णय घेण्यात आले, आत्मनिर्भर भारत, देशाच्या विकासाची मोदी गॅरंटी आहे, मात्र सुनिल तटकरे यांची गॅरंटी कोण घेणार?असा सवाल आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केला आहे. रायगडची परिस्थिती वेगळी आहे. बदलत्या परिस्तिथी नुसार सुनिल तटकरे यांनी देखील स्वतःला बदलवले पाहिजे. महायुतीच्या धोरणानुसार सूत्रानुसारभूमिका घेतली पाहिजे. अन्यथा सुनिल तटकरे यांचा कडेलोट करायला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्री यांच्यासमक्ष आम्हाला शब्द द्यावा, तरच आम्ही सहकार्याची भूमिका ठेवू, कर्जत मतदारसंघात जर राष्ट्रवादीचा आमदार बसविण्याचे मनसुबे तुम्ही रचत असाल तर कर्जत मतदारसंघातील शिवसैनिक शांत बसणार नाही. रायगड जिल्ह्यात यापुढे चुकीचे राजकारण चालू देणार नाही. पुढच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत तटकरे यांनी महायुतीचा धर्म पाळावा असे आवाहन आमदार थोरवे यांनी आढावा बैठकीत केले.

मागील राजकीय घडामोडीत मीही बळी ठरलो - आमदार महेंद्र दळवी

महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. भारतीय जनता पार्टी कडून रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत जे उरण विधानसभा पॅटर्न राबविले तसे पॅटर्न राबविण्याची भाषा केली जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जरा सबुरीने घ्यावे. अबकी बार 400 पार ची भूमिका घेताना 399 होऊ नये याची दक्षता घ्यावी. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवर शिवसेनेचा हक्क आहे. कारण जिल्ह्यात शिवसेनेची ताकत सर्वाधिक आहे. लोकसभेची निवडणूक पुढील सर्व निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. लोकसभेच्या उमेदवारांनी पुढील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला पाहिजे. मागील रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत माझाही बळी गेला असल्याचा गौप्यस्फोट दळवी यांनी केला. त्यामुळे अंतर्गत मतभेद आणि मनभेद याचा मोठा फटका सुनिल तटकरे यांना येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते आहे.

लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा आम्ही अभ्यास करू:- प्रकाश देसाई

रायगड जिल्ह्यात शिवसेनेची ताकत खूप मोठी आहे. रायगड लोकसभा उमेदवारी शिवसेनेला मिळावी अशी आमची मागणी आहे. महायुतीमधील लोकसभा उमेदवाराच्या प्रचाराबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा जो आदेश येईल तो आदेश शिरोधार्ह मानून आम्ही काम करू, पण लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा आम्ही अभ्यास करू. कारण

आमदार महेंद्र दळवी, प्रमोद घोसाळकर आणी मी राष्ट्रवादीत मागील 10 ते 12 वर्ष काम केले आहे. आम्हाला आलेले अनुभव आणि विश्वासघात हतबल करणारा आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वानुभव आहे. रायगड जिल्हा परिषदेत यापूर्वी आमची निराशा झालेली आहे. पुन्हा विश्वासघात होऊ नये ही अपेक्षा आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची विजयाची ताकत जर तुम्हाला हवी असेल तर पुढील

पंचायत समिती,जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पूर्णपणे साथ मिळेल अशी शाश्वती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष बैठक घेऊन त्या लोकसभा उमेदवाराकडून तसा शब्द घ्यावा असे आवाहन देसाई यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे तटकरेंवर बाण

सुनिल तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे मदत करू, पण त्यांनी देखील पुढील निवडणुकीत शिवसेनेला सहकार्य केले पाहिजे, असा शब्द मुख्यमंत्री महोदयांसमोर घेणे गरजेचे आहे. शिवसेनेचे तीन आमदार आहेत, रायगड जिल्हा परिषदेत देखील अनेक सदस्य निवडून येतील, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचाच व्हावा यासाठी सर्वांनी मदत करणे अपेक्षित आहे. सुनिल तटकरे यांना जे जे मदत करतात पुढे त्यांना ते नामशेष करतात असा इतिहास असल्याचे घोसाळकर यांनी सांगत आपला रोष व्यक्त केला.

Updated : 26 March 2024 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top