Home > Max Political > `भाजपा' नेत्यांच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का ?

`भाजपा' नेत्यांच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का ?

सात महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत.

`भाजपा नेत्यांच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का ?
X

७ महिन्यांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाला आणि आघाडीचे सरकार जावून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले(Shinde Fadnavis Government). मात्र या सरकारमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असल्याचे पाहायला मिळत आहे. नक्की हे काय प्रकरण आहे. जाणून घेवूया...

येत्या २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील सत्ता संघर्षांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लागण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी व्यक्त केली. मात्र त्याअगोदरच शिंदे आणि फडणवीस गटातील आमदार आणि खासदार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांना दृष्य स्वरुपातील विकास दाखवता यावा, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मुंबई शहरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आता खुद्द भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मुंबईतील भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सुशोभीकरणासाठी शहरात सुरु असलेल्या निविदा प्रक्रियांमध्ये भ्रष्ट्राचार झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदारानेच थेट भ्रष्ट्राचाराचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या आरोपा अगोदर ठाणे जिल्ह्यात सुद्धा भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय केळकर (BJP MLA Sanjay Kelkar) यांनी गेल्या आठवड़्यात ठाणे महापालिकेत भ्रष्ट्राचार झाल्याचा थेट आरोप केला आहे. या आरोपावरुन त्यांचा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (TMC Commissioner ) यांच्याशी वादही झाला आहे.



मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ शकते, तर ठाणे महापालिकेची का नाही? असा थेट सवाल भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. भाजप आमदार कोटेचा यांच्याप्रमाणेच केळकर यांनीही ठाणे मनपामध्ये ही सुशोभीकरण आणि विकासकामांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्ट्राचाराची चौकशी न झाल्यास २७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या आडून भाजपचे दोन्ही आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे हे आमदार कोणाच्या सांगण्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत आहेत. याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मोठा गाजावाजा करत वरळीमधे आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कार सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे ही सभा अयशस्वी झाल्याचे चित्र समोर आले. गेल्या महीन्यात 19 जानेवारी रोजी एमएमआरडीए मैदानावर (MMRDA Ground) झालेल्या पंतप्रधानांच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal singh Chahal) यांची उघडपणे प्रशंसा केली होती. त्यामुळे आता भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी एका नव्या फॉर्म्युलाची पुनरावृत्ती सुरू केली आहे.


भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत "मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले." असल्याचे वक्तव्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. त्यानुसार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या आसपासच्या नेत्यांनी नविन पद्धतीचा अवलंब करत मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे त्यांच्या आरोपांवरुन दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे "माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे." हे वक्तव्य नागपूर जिल्ह्यातील आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीही असेच वक्तव्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्रांच्या जवळच्या व्यक्तीवर आरोप करुन त्यांना घेरण्याचा तर हा प्रयत्न तर नाही ना असा संशय निर्माण होतोय. पण यामागे कुणाचा हात आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी राज्याच्या राजकारणात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यत मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी आता फडणवीस समर्थक आमदार अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा वादग्रस्त बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

Updated : 10 Feb 2023 3:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top