Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांनो,अज्ञान आणि डोळ्यासमोरील झापड काढा

शेतकऱ्यांनो,अज्ञान आणि डोळ्यासमोरील झापड काढा

शेतकऱ्यांनो,अज्ञान आणि डोळ्यासमोरील झापड काढा
X

शेती परवडत नाही, शेती मध्ये प्रचंड खर्च वाढला. ह्यानं लाखो कमावले, तो गाळात गेला. या सगळ्या शेतीच्या आजूबाजूच्या चर्चांचा मूळ आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यावर असलेलं अज्ञान आणि माहितीचं झापड.. शेतकऱ्यांच्या माथी अनावश्यक खर्च लादणाऱ्या 'सिस्टम'वर प्रहार केला आहे, निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खपळे यांनी..

' अति उत्तमतेच्या नादात पिकावरील खर्च वाढवू नका '

१- सध्या रब्बी हंगामातील द्राक्षे, कांदा व जोडीला गहू हरबराही येऊ लागलायं अश्या पिकावरील शेतकऱ्यांचे मजुरीबरोबर खते व पेस्टीसाईडचा खर्च वाढू लागलायं. शेतकऱ्यांचे खर्च व उत्पन्नाचं बजेट कोसळू लागलयं.

२- ह्याचं एकमेव कारण मला तर शेतकऱ्याचं अज्ञान व डोळ्यावर असलेली ' झापडं ' हेच एकमेव कारणं दिसतंय. आला ना राग, ! बरोबर आहे. आलाच पाहिजे. राग येण्यासाठीच बोललोय. कुणी अज्ञानी किंवा झापडं म्हटल्यावर राग येणारच! पण मी तुमच्यातलाच आहे. मी तुमचाच आहे. सौम्य भाषेत सांगुन थकलो म्हणूनच चिमटा काढून राग येण्यासाठीच बोललोय. हे बघा माफी मागतोय! माफ करा. पण 👇 हे ऐकाच -

३- पंडितासारखे राजकारणावर गप्पा मारणारे आम्ही शेतकऱ्यांचे मुलं जे शेतात पीक घेतो त्याला प्रति एकरी लागणारी किती किलो मूळ N:P:K:S खते अन कधी टाकावीत माहित करून घेत नाहीत. कधीही उठ-सुठ, तु काय टाकलं, त्यानं काय टाकलं अन मग मी काय टाकावं ह्या खेळात पैसे खर्च करून पिकाची हेळसांड करतोय. ज्यांच्याकडे बजेट जास्त व ' लय भारी तुझा प्लॉट ' अश्या मनभुकाळुंच्या पिकाची तर खुपच हाल हो, काय खाऊ अन काय नको असे त्याच्या पिकाची अवस्था होतेय. त्याचं पीक म्हणतंय काय मालक नशिबी आला माझ्या? म्हणजे कसं, बघा, मोठया घरच्या पोराला अति सकस खाऊ घालून कसे ढेबरं बनवतात तसे हाय बजेट वाल्याच्या पिकाचे हाल होतांना बघतोय. बरं, एवढं करूनही माझा प्लॉट एक नंबरचा का नाही म्हणून मग ह्याची चिडचिड. अरेरे! काय हे! कारण अति खत घालून, अति फवारण्या करून ह्याने अगोदरच जमीन नासून ठेवलीय.

४- शेतकऱ्यांनी माफक सेंद्रिय व हिरवळ खताबरोबरच मूळ नत्र स्फूरद, पालाश, गंधक व नेमक्या वेळी एकदा तणनाशक तर ट्रायको, सुडोमोनस, बेसिलंस सारख्या जैविकं तर PSB, KMB कडे लक्ष केंद्रित करून पीक जिंकावं असे माझं मत आहे. गरज तेथेच Ca, Zn, Mg, Mo वापरू. उदा. मक्याला Zn ची गरज तेवढेच माती परीक्षण करूनच वापरू. नाही तर आजकाल मायक्रोनुट्रीयंटचेही एक वेगळं फॅड निघालय. पूर्वी बालकाला

३ डोस होते आता तर मोठी यादीच तयार होतेय त्यातला हा भाग समजावा. आवश्यक तेथेच येथे आपण हुशार होवु. येथेच पांडित्यां दाखवू. येथेच आपण दुर्लक्ष करतो आहोत अन स्व:सहमतीने पेस्टीसाईडवाल्यांना लूट करून देत आहोत.

५- आज काल कंपन्यांनी सगळ्याच पिकावरचे डॉक्टर्स उपलब्ध करून तेही बिचारे ड्युटी म्हणून रानोमाळ फिरताय. थकताय. किती टारगेट पुर्ण झालं? म्हणून एकमेकांना विचारतात. त्यांनीही शेतकऱ्यांची डोके पार बधिर करून टाकलीत. सगळेच शेतकऱ्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन धंदा करायला निघालेत. आपणही आधाश्यासारखे त्याने सांगितले रे सांगितले कि खरेदी करून करायला तुटून पडतोय. कांदा पिकाला द्राक्षे पिकासारखी आठ - आठ शेड्युल पुर्ण करावयास सांगणारी डॉक्टर्स फिरत आहेत.

६- आपण काय फवारतो? ह्यातील घटक काय? कंपनी कोणती? किंमत काय? शेजारच्या चांगल्या मार्केटच्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्याची किंमत काय? कधी केली चौकशी? स्थानिक गावातच मिळतंय म्हणून २५%, ४०% तर कधी कधी त्याहून अधिक पैसे देऊन खरेदी करणारे शेतकरी पाहिले आहेत. किंमतीबद्दल कधी विचारणा केली? येथे कोठे गेलं तुमचं पांडित्य !

चौकशी करा! तुलना करा! मगच खरेदी करा! एक दिवस उशीर होवु दे! पण योग्य भावातच खरेदी करा! भले थोडे दूर जावे लागले तरी जा! सामूहिकपणे खरेदी करा. जागृत व्हा! तुमच्या सामूहिक जागृतीने तुमच्याच गावात तुम्हाला योग्य व रिझनेबल दरात पेस्टीसाईड मिळू लागलेत तर आश्चर्य वाटायला नको? मिळालेच पाहिजे. तो तुमचा हक्क आहे. फक्त जागे व्हा! प्रत्यक्षात असे होत नाही हो, असं म्हणून अगोदरच रडू नका. अज्ञानापोटी तुमच्या घामाची अतिरिक्त लूट होवु देऊ नका!घामाच्या थेंबाबरोबर नशीब बदलायलाही विधात्याने शेतकऱ्याला हे कपाळ दिलंय. ते उजळायचेही आहे. शेवटपर्यंत घामाने काळं ठेवायचं नाही. काय करायचं ते ठरवा!

एवढेच!

माणिकराव खुळे, वडांगळी.

Updated : 24 Jan 2022 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top