Home > मॅक्स ब्लॉग्ज > पालकमंत्र्याच्या गावात तमाशाचा निर्माता उपेक्षित

पालकमंत्र्याच्या गावात तमाशाचा निर्माता उपेक्षित

देशातील पहिले वगनाट्य लिहिणारे, पहिला तमाशा सुरु करणारे बाबाजी पेडकर यांची समाधी गटाराकडेला उपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बाबाजी पेडकर यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा सागर गोतपागर यांचा ग्राउंड रिपोर्ट नक्की वाचा....

X

“पेडच्या शिवंला रेवणसिद्ध मंदिर हुतं. त्या मंदिरात भेदिक गाणारे नाना पाटील दररोज यायचे. याची खबर बाबाजींना लागली होती. काही करून आपण तिथ जायचं आणि त्यांच्याकडून भेदिक शिकून घ्यायचं असा चंग त्यांनी बांधला. बाबाजींनी पिंपळाची दोन पाने आणि चाफ्याची दोन फुले तोडली. नाना पाटील मंदिरात गेले. त्यांनी बाहेर काढून ठेवलेल्या दोन जोड्यावर पिंपळाची पानं आणि चाफ्याची फुलं ठेवली. ते पाठीमागे गायमुखाच्या बाजूला जाऊन बसले. नाना पाटील आले. त्यांनी ती फुले बघितली. फुले कुणी ठेवली असतील असा विचार केला आणि ते निघून गेले. नाना पाटलांच्या जोड्यावर पिंपळाची पाने आणि चाफ्याची फुले ठेवायची आणि बाजूला गायमुखाजवळ जाऊन बसायचं. असा नित्यक्रम तब्बल एक वर्ष बाबाजींनी केला. हे पाहून त्यांच्या सोबत असलेले बाळा पाटील यांनी काहीही करून आज ही पाने फुले कोण ठेवतंय याचा शोध लावायचं ठरवलं. नाना पाटील त्या दिवशी बाहेर जोडे ठेऊन आत गेले. थोडा वेळ गाणे बंद ठेवले. आणि आतून जोड्यावर लक्ष ठेऊ लागले. तेवढ्यात त्या जोड्याजवळ बाबाजी आले. त्यांनी हातातील दोन पिंपळाची पाने दोन चाफ्याची फुले जोड्यावर ठेवली. ते उठणार इतक्यात नाना पाटलांनी जाऊन त्यांचे दोन्ही हात पकडले. त्या क्षणाला सोबत असणारे बाळा पाटील बाजूला झाले. म्हणाले अहो गुरुजी तो मांगाचा माणूस आहे. तुम्ही त्याला शिवलं? आता गावातील लोक काय म्हणतील ? असे म्हणून ते निघून गेले. नाना पाटलांनी त्याचे ऐकले नाही. त्यांनी बाबाजीला विचारले तुला काय हवे आहे ? यावर बाबाजी म्हणाले मला तुमचे शिष्यत्व हवे आहे. पण त्यासाठी तुम्ही माझी परीक्षा घ्या. त्या क्षणाला बाबाजींनी नाना पाटलांनी वर्षभर गायलेली भेदिक, कलगी तुरा, गाणी त्यांच्या समोर सादर केली. हे ऐकायला त्यांना दोन दिवस गेले. त्या क्षणाला नाना पाटील बाबाजींना म्हणाले तू केवळ शिष्यच नाहीस तर माझा मुलगा आहेस. तुला शिष्यत्वाची दीक्षा देण्यासाठी मी गुडीपाडव्याला पेडमध्ये येतो असे सांगितले. नाना पाटील यांनी मांग समाजाच्या व्यक्तीस स्पर्श केल्याची बातमी घरी समजली. त्यानंतर ओढ्यात एकदा आणि घराच्या दारात एकदा अंघोळ केल्यावरच नाना पाटलांना घरात घेतले गेले. मांग समाजाच्या व्यक्तीला शिष्यत्व देण्यास इतरांनी विरोध केला. पण नाना पाटील यांनी कुणाचेही ऐकले नाही. त्यांनी स्वतः पेडमध्ये जाऊन बाबाजींच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील लिंग परिधान केले आणि शिष्यत्वाची दीक्षा दिली”.





जेष्ठ तमाशा कलावंत शाहीर रामहरी भाट यांनी बाबाजी पेडकर यांच्या आयुष्यातील हा किस्सा मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना सांगितला आहे.

गुडीपाडव्याला नाना पाटलांकडून शिष्यत्व स्वीकारताच बाबाजी पेडकरांनी वगनाट्य लिहिण्यास सूरवात केली. मोहना बटाव हे गाजलेले पहिले वगनाट्य लिहिले. मोहना बटाव हे देशातील पहिले तमाशाचे वगनाट्य ठरले. राजा हरिश्चंद्र, रुसवा, लक्षुमी, उपकाराची फेड, सातारची नागकन्या असे एकाहून एक सरस वगनाट्ये लिहिली. आजूबाजूला असलेल्या मातंग समाजातील कलाकारांना एकत्रित केले. भिलवडी येथे चाकरीला असलेल्या आपल्या बहिणीचा मुलगा उमाजी याला पेडला आणले. त्या दोघांच्या नावाचा राज्यातील पहिला तमाशा उमा बाबाजी पेड सावळजकर हा उभा केला. तमाशाची सुरवात पेड या गावातूनच झाली. याबाबत जेष्ठ तमाशा कलावंत शाहीर रामहरी भाट सांगतात “ तमाशाची पहिली मुहूर्तमेढ पेडमध्ये रोवली. तमाशाचा कल्पवृक्ष पेड या गावातच रुजला. या कल्पवृक्षाचा बुंधा पेडमध्ये तर त्याच्या फांद्या महाराष्ट्रभर विखुरल्या. त्या प्रत्येक फांदीला तमाशा नावाचे फळ लागले. त्या वृक्षाच्या स्थापनेचे श्रेय फक्त बाबाजींचे आहे. आजही बाबाजींचे गाणे नाही असा एकही तमाशा अस्तित्वात नाही”.





बाबाजींनी सुरु केलेला तमाशाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पुढे तर तमाशा ही महाराष्ट्राची ओळख बनली. उमा बाबाजींच्या नंतर चिमा-तातोबा,शंकर-मारुती,जयवंत-बाबू या पिढ्यांनी तमाशाचा वारसा जतन केला. हा तमाशा पाहून राज्यात इतरही तमाशे सुरु झाले. त्यामध्ये प्रामुख्याने सातू-हिरू, शिवा-संभा, संभू गोपाळा, तुका सांगावकर यांनी तमाशाचे फड सुरु केले. या तमाशात बाबाजींनी लिहिलेली वगनाट्ये, गण आणि गाणी वापरली जात होती. महाराष्ट्रात त्या काळापासून ते आजपर्यंत असा एकही तमाशा नाही की ज्या तमाशामध्ये बाबाजींनी लिहिलेले साहित्य नाही.


तमाशाला सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणाऱ्या बाबाजी पेडकर यांच्या स्मृती अद्याप पर्यंत जतन करण्यात आलेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेली वगनाट्ये आजही लिखित स्वरूपात प्रकाशित झालेली नाहीत. तमाशाचा इतिहास पुस्तक स्वरूपात देखील आलेला नाही. पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास विस्मृतीत जाण्याची भीती आहे. ज्या काळात अस्पृश्यांना लेखणी हातात घेण्यास बंदी होती त्या काळात बाबाजींनी वगनाट्ये, गाणी लिहिण्याचा विद्रोह केला. आपल्या कलेच्या जीवावर त्यांनी जातीयतेवर मात केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या कलाकाराची समाधी आज त्यांच्या सांगली जिल्ह्यातील पेड या गावी उपेक्षित आहे. समाधीच्या कडेला गटाराची घाण तसेच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

बाबाजींच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा, तमाशा कलावंतांची मागणी

उमा बाबाजी तमाशा संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तमाशा कलावंत अनेक वर्षापासून या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी करत आहेत. परंतु लोकप्रतिनिधी त्यांच्या या मागणीची दखल घेत नाहीत. या संघटनेचे अध्यक्ष भास्कर सदाकाळे यांनी दोन महिन्यात समाधीचा जीर्णोद्धार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आहे.

पालकमंत्र्यांच्या गावी तमाशाचा जनक उपेक्षित

बाबाजींची समाधी ज्या पेड या गावात आहे ते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे मुळ गाव आहे. एका मंत्र्याचाच गावात राज्याचा सांस्कृतिक नायक उपेक्षित राहतो हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. तरी सरकारने तातडीने दखल घेऊन बाबाजींच्या समाधीचा यथोचित सन्मान करून पेड या गावात तमाशा कलेचा इतिहास जागृत ठेवणारे संग्रहालय उभे करावे ही मागणी कलाकार करत आहेत...




Updated : 1 Oct 2023 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top