Home > मॅक्स ब्लॉग्ज > लोकांना शहाणे करणे, इथे पाप आहे !

लोकांना शहाणे करणे, इथे पाप आहे !

लोकांना शहाणे करणे, अंधश्रद्धा मुक्त करणे, विज्ञाननिष्ठ बनवणे, विवेकवादी आणि बुद्धी प्रामाण्यवादी बनविणे हे यादेशात पाप आहे. तुम्ही असे कराल तर इथले, देवाचे, धर्माचे ठेकेदार आणि त्यांच्या जीवावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी तुमचा खून केल्याशिवाय राहणार नाहीत.

लोकांना शहाणे करणे, इथे पाप आहे !
X

जिथे गणपती दूध पितो ही अफवा आगी सारखी पसरते आणि लांबच लांब रांगा दुधाचे भांडे घेऊन मंदिरा समोर उभे रहातात त्यादेशातील लोकांना शहाणे करणे हे पाप आहे.

मग हे पाप ज्या समाज सुधारकांनी केले त्यांना ठार मारले. ज्या संतांनी हे काम केले त्यांच्या हत्या केल्या गेल्या. आणि त्याच संत किंवा समाजसेवकाच्या नावाने नव्याने हा धंदा सुरू केला जातो

लोक मूर्ख राहावेत त्यांनी आपण सांगत असलेल्या कपोल कहाण्या मध्ये, व्रत वैकल्यात गुंग राहावे त्यामुळे आपला दुहेरी धंदा सुरू राहील. एकीकडे मूर्ख अंधश्रद्ध आणि अविवेकी लोकांची झुंड तैयार होईल. ही झुंड लोकप्रतिनिधींना विकता येते, आपले सामर्थ्य म्हणून प्रदर्शित करता येते आणि याच झुंडीतील माथेफिरुचा वापर करून आपल्या हिताच्या आड येणाऱ्या बऱ्या वाईट अश्या कुठल्याही व्यक्तीला सहज ठार मारता येते, बदनाम करता येते, त्याचे घर जाळून टाकता येते

हे यादेशात हजारो वर्षा पासून सुरू आहे. यांनी धर्म स्वतःची जहागीर समजून लोकांना त्याच्या ज्ञानापासून हजारो वर्षे दूर ठेवले. आपल्या शिवाय कुठलेही धार्मिक कार्य मग जन्म असो, लग्न असो, मृत्यू असो की गृहप्रवेश, निवडणुकीचा फॉर्म भरायचा असेल किंवा नवा उद्योग सुरू करायचा असेल आपली आणि आपल्या जातभाईची व्यवस्था लावणारी धर्म व्यवस्था यादेशात आहे .

मात्र याच्या विरोधात तुम्ही बोलू लागला, सत्य लोकांना सांगू लागलात तर लगेच इथली ही व्यवस्था सक्रिय होते आणि मग सुरुवातीला नास्तिक म्हणून दूषणं दिली जातात, मग धर्मद्रोही म्हणून प्रचारीत केले जाते नाहीतर विदेशी एजंट म्हणून सांगितले जाते, यांना धर्माची बदनामी करण्यासाठी विदेशी फंड येतो सांगितले जाते

मात्र ती व्यक्ती काय बोलते आहे ? धर्मातील अंधश्रद्धेवर आक्षेप घेत आहे, कुठल्या अमानवीय प्रथा, व्रत वैकल्य यांना विरोध करत आहे त्यावर उत्तर किंवा पुरावा देण्या ऐवजी आमच्या देवाचे वचन आहे, आमच्या धर्मग्रँथात आहे आमची हजारो वर्षांची ही परंपरा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अशी आमची अढळ श्रद्धा आहे त्यावर वाद, चर्चा नाही होऊ शकत. त्याबद्दल आम्ही कुणाला स्पष्टीकरण द्यावे याची आम्हाला गरज नाही

आणि जो अश्या पद्धतीने आमच्या श्रद्धास्थानावर शँका घेईल, आक्षेप घेईल, विरोध करेल, त्याबद्दल लोकांच्या मध्ये जाऊन प्रचार करेल त्याला आमच्या मार्गाने धडा शिकवण्याचा आम्हाला अधिकार आहे असे मानणारा वर्ग आहे. त्यांचे मानणे आहे की काही लोकांना देवाने, मूर्ख,अर्धवट, अज्ञानी आणि भित्रे ठेवले आहेत ते आमच्यासाठीच . त्यांना शहाणे करून हा देव अज्ञाचे उल्लंघन ही व्यक्ती करते आहे, आमच्या पोटा पाण्याच्या व्यवसायावर गदा आणते आहे, ही राक्षस आहे असा त्यांचा विश्वास आहे आणि राक्षसाला ठार मारणे ही देवाज्ञा आहे.

डॉ नरेंद्र दाभोळकर हे असेच अनेक राक्षसांच्या पैकी एक राक्षस त्यांच्यासाठी होते . कारण ते सांगत देवाची पूजा करणे, प्रार्थना करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक इच्छेचा भाग आहे त्याला तसा अधिकार देशातील संविधान देते . मात्र देव आणि धर्माचे नाव घेऊन आपल्याला अमुक तमुक देव देवी प्रसन्न आहे आणि त्याने मला विशेष सिद्धी दिली आहे त्याने मी जगातील कुठल्याही व्यक्तीचे प्रश्न सोडवू शकण्याचा चमत्कार करू शकतो.

अश्यावेळी साधू बुवा स्वामी फादर मुल्ला कुणीही दावा केला की नरेंद्र दाभोळकर त्या बाबा बुवा यांना चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान देत. ते जिवंत असे पर्यंत आणि त्यानंतर देखील हे आव्हान त्यांच्या संघटने मार्फत दिले जाते आणि चमत्कार सिद्ध करणाऱ्यास 25 लाखाचे बक्षीस देण्यात येईल, हे देखील जाहीर आहे मात्र आता पर्यंत कुणी बाबा , बुवा , साध्वी , फादर , मुल्ला हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे आला नाही आणि जे आले त्यांनी ऐनवेळी मैदानातून पळ काढला. त्याचे अलीकडचे मोठे उदाहरण म्हणजे बाबा बागेश्वर महाराज

आयुष्यातील हतबलता, अपयश, आजारपण, भीती आणि लोभ ह्या गोष्टी आहेत ज्यामुळे व्यक्ती अश्या भोंदू बाबाच्या नादी लागतात किंवा अडकतात. यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकांना प्रश्न विचारण्याची सवय , बुद्धी प्रामाण्यावादी विचार करण्याची सवय, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेकवादी विचार लोकांच्या मध्ये रुजविण्याचे काम डॉ नरेंद्र दाभोळकर करत होते.

कुंडली हे थोतांड आहे, आकाशातील ग्रह ताऱ्याचा अभ्यास करून वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले मात्र कोट्यावधी दूर अंतरावर असणारा शनि ग्रह हा 750 कोटी लोकसंख्येच्या जगात बरोबर भारत देश शोधून त्यातील एक जिल्हा आणि त्यातील शहर, गाव त्या गावातील एक घर आणि त्या घरातील कुटुंबातील 5 सदस्य पैकी याच व्यक्तीला पकडून शनि त्रास देईल असे समजणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे उच्च कोटीचे मूर्ख असल्याचा पुरावा देण्यासारखे आहे.

त्याच बरोबर हवेतून वस्तू काढणे, अंगारा काढणे, घड्याळ किंवा सोन्याची अंगठी काढणे हे सर्व प्रकार हात चलाखी आहेत

डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी ही मोहीम सुरू केल्यावर अनेक बाबा बुवांनी त्यांचा धसका घेतलाच पण शकुंतला देवी सारखी बाई जिला मानवी संगणकाची उपमा दिली होती तिला श्याम मानव यांनी आव्हान दिले असता ती पळून गेली होती.

त्यानंतर नवीन जो बुवा बाजीचा पॅटर्न आला तो अधिक हुशारीचा आला . नवे बाबा बुवा साध्वी एखाद्या देवी देवता आणि धर्मग्रँथाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या माध्यमातून आपले हे उद्योग करू लागले , बाबा बुवा स्वतःच सांगू लागले आम्हीच अंधश्रद्धा आणि बुवा बाजींच्या विरोधात आहोत, आम्ही वृक्षारोपण करतो, लोकांची व्यसन सोडवतो, आपल्या धर्म आणि संस्कृतीचे अभ्यास वर्ग चालवतो, आपल्या आयुर्वेदचा प्रचार करतो, कुटुंबात शांतता नांदावी म्हणून समुपदेशन करतो, दवाखाना चालवतो, लंगर चालवतो, शाळा कॉलेज चालवतो असेही बाबा बुवांची नवी आधुनिक संगणकवाली पिढी आली आहे जी फराटेदार इंग्रजी आणि संस्कृत बोलून लोकांच्यावर छाप पाडून आहे , त्यांच्याकडे अमाप संपत्ती आणि सुविधा आहेत , त्यांच्या कडे सर्व आधुनिक सोयी सुविधा आहे आणि त्यांच्या सत्संग साठी लाखो लोक जमा होत असतात. मात्र हे कितीही तार्किक आणि धार्मिक बोलत असले तरी त्यांचा हेतू एकमात्र असतो तो म्हणजे आपल्या भक्तात श्रद्धा आणि विश्वास वाढवणे ज्यामुळे तो प्रश्न विचारणे बंद करेल, संशय घेणे बंद करेल आणि एखादा रोबट प्रमाणे तो आपल्या पंथाचे काम करेल.

या आणि अश्या सर्व भोंदूगिरी जी देव आणि धर्माच्या नावावर सुरू होती त्याची पोलखोल नरेंद्र दाभोळकर आणि त्यांचे सहकारी करत होते. फल ज्योतिष्य थोतांड आहे, हस्त रेषा ज्योतिष थोतांड आहे, प्रत्येक घटना घडते त्यामागे काही कारण अथवा विज्ञान असते , चमत्कार हेच मोठे थोतांड आहे..

डॉ दाभोळकर म्हणत आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी नाही घेतली आणि त्यांचे हे बोलणे आजही खरे आहे.

हे सर्व सांगत असताना तुमच्या मनात देखील प्रश्न सरकार, लोकप्रतिनिधी यासाठी का काही करत नाही ?

त्याचे उत्तर असे आहे की लोकप्रतिनिधीना निवडणुकीत लोकांची मते हवी असतात, त्यांना अश्या बाबा बुवा आश्रम मध्ये एकत्रित मिळतात त्यामुळे हे राजकारणी सर्व बाबा बुवा आणि आश्रमात हजेरी लावत असतात, बाबा यांची आणि हे बाबाची तारीफ करून एकमेकांचे बस्तान पक्के करत असतात, लोकप्रतिनिधीला मते मिळतात आणि बाबा बुवाला राजाश्रय मिळतो, त्यातून जमीन मिळते, सरकारी सुविधा मिळतात इतकेच नव्हे तर सरकारी पुरस्कार देखील अश्या बाबा बुवांना मिळत असतो अशी शेकडो उदाहरणे आहेत. मग हे बाबा आय आयटी , आयएमएम , विधानसभा सभा इथे देखील प्रवचन देण्यासाठी आमंत्रित केली जातात आता असे केल्याने देशातील भावी पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजणार ? यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत रोहिदास, संत चक्रधर, संत महात्मा बसवेश्वर , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , सावित्रिमाई फुले, शाहू महाराज अशी हजारो संत आणि महत्म्याची यादी देता येईल ज्यानी समाज हा अंधश्रद्धा, जातीयता, धर्मांधता आणि अज्ञानातून बाहेर यावा यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यासाठी आतोनात त्रास सहन केला.

इथे तुम्ही विचार करा यासर्व संत , महात्मा आणि महापुरुषाना विरोध करणारे कोण होते ? त्यांचा छळ करणारे कोण होते ? त्यांचा खून करणारे कोण होते ? कुणी गोर गरीब, सामान्य लोकानी यांना त्रास दिला का ? मुळीच नाही . त्याना त्यावेळी त्रास देणारे त्याकाळातील धर्माचे ठेकेदार होते किंवा धर्माच्या ठेकेदाराच्या आदेशाचे पालन करणारे राजे महाराजे होते.

आजही आपण डॉ नरेंद्र दाभोळकर , गोविंद पानसरे , कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या का झाल्या ? यानी कुणाचे खून केले का ? कुणाला पैशासाठी लुबाडले का ? कुणाच्या बायकोचे अपहरण केले होते का ? कुणाची संपत्ती लुटली होती ? हे किंवा यापैकी काहीही केले नव्हते. ते समाजाला शहाणे करण्याचे काम करत होते. बर त्याना विरोध कोण करत होते ? अशिक्षित लोक करत होते का ? मुस्लिम, ईसाई, शिख करत होते का ? याचेही उत्तर नाही असून त्याना विरोध करणारे हिन्दू नावाने संघटना चालवणारे होते. हिन्दुनी अज्ञानातून बाहेर येवू नये ते सदैव अज्ञानात राहावे ज्यामुळे आता जो आपला धर्माच्या नावाने शोषण करण्याचा आणि मूर्ख बनविन्याचा उद्योग सुरू आहे तो असाच सुरू राहिल त्यासाठी ते हिन्दू जागृती मंच, सनातन , हिन्दू रक्षण समिती अशी आणि याच प्रकारची नावे धारण करून हे कारस्थान करत असतात.

नव ग्रहाचे खडे विकुन लोकांना शेंडया लावणारे, फल ज्योतिष आणि हस्तरेषा, फेंगशुई , नारायण नागबळी, काल सर्प योग, नवग्रह पूजा यांच्या नावाने लाखोंचा गंडा घालणाऱ्या आणि आमुक तमुक देवी देवता अल्ला जीजस मला प्रसन्न आहे सांगून जादुचे प्रयोग करणारे आणि लुबाडणारे भामटे यांच्या धंद्या पाण्यावर गदा येत होती त्यामुळे सातत्याने ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांची बदनामी, खोट्या केसेस टाकून त्यांना हैराण करणे, ते विदेशी हस्तक आहेत, त्यांच्या संघटनेला बाहेरून कोट्यावधी रुपये येतात असा खोटा प्रचार करून बदनाम करणे आणि यासर्वाना देखील डॉ नरेंद्र दाभोळकर हार जात नाही तेंव्हा आपल्या तालमीत तैयार झालेल्या मंदबुद्धी तरुणांच्या हस्ते त्यांचा 20 ऑगस्ट रोजी निर्घृण पणे ते मॉर्निंग वाक ला जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

याहत्येला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांची हत्या करणाऱ्या संस्था आणि त्यांचे प्रमुख राजरोसपणे वावरत आहेत. जगात नावाजलेली तपास यंत्रणा म्हणून मिरवणाऱ्या पोलीस आणि अन्य तपास यंत्रणांना 10 वर्षात आरोपी पकडून त्यांना शिक्षा करता येऊ नये हे या यंत्रणांचे अपयश आहे किंवा यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. एका विवेकी, विचारवन्त, अभ्यासक आणि समाज सेवकाचा मृत्यू हे केवळ त्याच्या कुटुंबाचे किंवा तो ज्या जाती धर्मात जन्मला त्याचेच केवळ नुकसान असत नाही तर ते अखंड मानवतेचे नुकसान असते. त्यामुळे आज डॉ नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांचे काम मुळातून जाणून घेणे, त्यांनी लिहिलेली पुस्तक विकत घेऊन वाचणे, त्यांनी दिलेल्या मुलाखती पाहणे आणि हे केल्यावर जर तुम्हाला वाटले की डॉ नरेंद्र दाभोळकर हा देव, धर्म विरोधी व्यक्ती होती तर तुम्हाला तसे मत बाळगण्याचा हक्क असेल. मात्र काहीच न वाचता किंवा केवळ व्हाट्स अप वर आलेल्या चुकीच्या, खोट्या आणि दिशा भूल करणाऱ्या पोस्ट वाचून मत बनवणे हा डॉ दाभोळकर यांच्यावर अन्याय तर आहेच , शिवाय स्वतावरही गैरसमाजाची पुटे चढवून घेण्याचा प्रयत्न आहे.

व्यक्ती मेली म्हणजे तिचा विचार मरतो हे डॉ नरेंद्र दाभोळकर आणि इतर सर्वच संत महात्म्याच्या बाबत खोटे ठरले असून आजही हजारो कार्यकर्ते त्यांचे नाव आणि विचार घेऊन हे काम "आम्ही सारे दाभोळकर" म्हणून पुढे नेत आहेत.

कुठल्याही बाबा, बुवा, साध्वी चमत्काराची , अलौकिक शक्तीची भाषा करत असेल तर लगेच तुम्ही डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितल्या प्रमाणे चिकित्सा करा, प्रश्न विचारा, शोध घ्या, विज्ञान कसोट्या लावा असे केल्याने तुम्हाला सत्य काय याची प्रचिती येईल, असे करणे ही देखील डॉ नरेंद्र दाभोळकर यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल

Updated : 20 Aug 2023 10:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top