Home > मॅक्स ब्लॉग्ज > वाकड्या, वाकड्या तोंडाचा, फावड्या, ढेरपोट्या, टरबूज, शेंबड्या; समाजाला उपचारांची गरज

वाकड्या, वाकड्या तोंडाचा, फावड्या, ढेरपोट्या, टरबूज, शेंबड्या; समाजाला उपचारांची गरज

सोशल मिडीयावरील काही पोस्ट पाहण्यात आल्या. अमेय खोपकर यांच्या वॉलवर त्यांच्या शारीरिक व्यंगावर खूप जणं बोलताना पाहिली. तर अमेय खोपकरांना एक दुर्मिळ स्वरूपाचा आजार आहे. Ankylosing Spondylitis आता काहींना याचा उच्चार ही जमणार नाही, तर याला बांबू स्पाइन ही म्हणतात. या आजारात मणका, मान, हिप बोन किंवा गुडघा या सांध्यांमध्ये फ्युजन होते आणि त्या सांध्यांची रचना बांबूचे सांधे जसे असतात तशी होते. यात सांध्यांची हालचाल संपुष्टात येते आणि हे सांधे आहे त्या अवस्थेत आखडून जातात. या आजारात रूग्णाला मरणाच्या वेदना होत असतात. त्याचबरोबरीने शरीराची हालचाल बाधीत झाल्यामुळे अन्य सतराशे साठ आजारही लागतात. त्यात तर सपोर्ट सिस्टीम चांगली नसली की मानसिक खच्चीकरण ही होते. याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचा लेख...

वाकड्या, वाकड्या तोंडाचा, फावड्या, ढेरपोट्या, टरबूज, शेंबड्या; समाजाला उपचारांची गरज
X

वाकड्या, वाकड्या तोंडाचा, फावड्या, ढेरपोट्या, टरबूज, शेंबड्या अशा विविध टोपणनावांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांचा उल्लेख सोशल मिडीयावर पाहायला मिळतो. कधी कधी सहज वाटतं हे, पण यामुळे अनेक लोकं डिप्रेशन मध्ये गेल्याचं मी पाहिलंय. काही आजार असतील तर ॲबनॉर्मल समजायचा समाजातील काही लोकांचा दृष्टीकोन अतिशय आजारी स्वरूपाचा आहे. नीटनेटका, फिट दिसणाराच आपला हिरो असावा असा अट्टाहास कशासाठी असावा.

काही असाध्य आजारांमुळे व्यंग येऊ शकते. अशा वेळी रूग्णाची शारीरिक आणि मानसिक पडझड झालेली अशावेळी रूग्णाचं मानसिक स्वास्थ टिकून राहावं यासाठी मूळ रोगावरील उपचारापेक्षाही जास्त श्रम घ्यावे लागतात.

सोशल मिडीयावरील काही पोस्ट पाहण्यात आल्या. अमेय खोपकर (Amey Khopkar) यांच्या वॉलवर त्यांच्या शारीरिक व्यंगावर खूप जणं बोलताना पाहिली. तर अमेय खोपकरांना एक दुर्मिळ स्वरूपाचा आजार आहे. Ankylosing Spondylitis आता काहींना याचा उच्चार ही जमणार नाही, तर याला बांबू स्पाइन ही म्हणतात. या आजारात मणका, मान, हिप बोन किंवा गुडघा या सांध्यांमध्ये फ्युजन होते आणि त्या सांध्यांची रचना बांबूचे सांधे जसे असतात तशी होते. यात सांध्यांची हालचाल संपुष्टात येते आणि हे सांधे आहे त्या अवस्थेत आखडून जातात. या आजारात रूग्णाला मरणाच्या वेदना होत असतात. त्याचबरोबरीने शरीराची हालचाल बाधीत झाल्यामुळे अन्य सतराशे साठ आजारही लागतात. त्यात तर सपोर्ट सिस्टीम चांगली नसली की मानसिक खच्चीकरण ही होते. माझ्या ओळखीच्या काही लोकांना हा आजार आहे. पाण्याच्या क्षेत्रात वाहून जाऊन काम करणाऱ्या आणि लाखों लोकांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या मानवलोकच्या अनिकेच लोहियांनाही हा आजार आहे. मी स्वतः या Ankylosing चा सामना करतोय. त्यामुळे या आजाराबाबत जरा अधिकारवाणीने बोलूही शकतो. अमेय खोपकर यांच्यासोबत माझी तशी फार ओळख नाही, पण मी त्यांच्याशी फोनवर सतत बोलत असतो. ते ज्या परिस्थितीचा सामना करून स्वतःला सार्वजनिक जीवनात सक्रीय ठेवत आहेत, ते मला चांगलंच माहितीय. शरीराला रेटणं हा शब्द अतिशय योग्य ठरेल अशी स्थिती आहे, तरीही ते सक्रीय आहेत. त्यांच्या भूमिकांवरून वाद असू शकेल, पण म्हणून माणूस द्वेषाचा पात्र होऊ शकत नाही, संवादी वादाची महाराष्ट्राची परंपरा राखली गेली पाहिजे. त्यांच्या व्यंगावरून त्यांना चिडवणं गलिच्छ मानसिकतेचं लक्षण आहे.




शरद पवार (Sharad pawar ) यांना वाकड्या तोंडाचा, सतत नाक पुसणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना शेंबड्या, उध्दव ठाकरे यांना फावड्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टरबुज म्हणणं हे सर्वथा आजारी मानसिकतेचं लक्षण आहे. आपण आपली संवेदनशीलता गमावत चाललो आहोत का? आमची स्नेही नेहा पुरव (Neha Purav ) यांना मध्यंतरी अशाच एका अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण बदलली. अनेकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला. भेटणाऱ्यांच्या नजरेत झालेला बदल त्यांना अस्वस्थ करत होता. त्यातून महत्प्रयासाने त्या बाहेर पडल्या आणि पत्रकारिता करू लागल्या. त्यांनी आजवर पत्रकार म्हणून अनेक गरजूंना मदत केलीय, अडीअडचणींना धावून गेल्यात, पण जी परिस्थिती आपल्या हातात नाही, त्यासाठी समाजाने असं कुणाला वेगळ्या नजरेने बघणं, टोमणे मारणे योग्य नाही. कँसरवर मात करून शरद पवार कुठल्याही निरोगी माणसापेक्षा जास्त काम करतात, देवेंद्र फडणवीस ही सतत कार्यमग्न असतात. शारीरिक व्याधी सगळ्यांनाच असतात, १०० टक्के निरोगी कोणीच नसतो. अशा वेळी आजारपणांबाबतची माहिती, संवेदनशीलता, सपोर्ट ग्रुप याबाबत आपल्या समाजात जागरूकता आली पाहिजे. समाजमाध्यमांचा फार खोलवर परिणाम होतो, हे लक्षात घेऊन आपण लिहिलं पाहिजे. समाजमाध्यमांवर अशा पद्धतीचं लिखाण जर सर्वमान्य झालं तर कदाचित या ट्रेंडचे पिडीत तुम्ही ही असू शकता. तुमच्या घरातलं एखादं आजारपणही चेष्टेचा विषय होऊ शकतो.




मुंबईच्या टाटा कँसर रूग्णालयात जर एखाद्या दिवशी तुम्ही फिरून आलात तर तुम्हाला आजारपण, वेदना, दुःख, एकटेपण, नैराश्य आणि जगणं म्हणजे काय असतं हे समजून येईल. कुठल्याही रूग्णालयात गेलात तर तुम्हाला जगण्याचा संघर्ष कळेल. समाजात ज्यांचा प्रभाव असतो अशा व्यक्तींच्या सोशल मिडीयावर जेव्हा तुम्ही व्यक्त होत असता तेव्हा तुमच्या कमेंटस हजारो लोकं वाचत असतात. अशा वेळी तुमची प्रत्येक प्रतिक्रिया ही सार्वजनिक असून त्याचा समाजावर काही ना काही प्रभाव पडणार आहे हे लक्षात घ्या. सतत हिंसक राहणं, अश्लाघ्य-अश्लील भाषेत बोलणं हे सर्व मानसिक आजारच आहेत. सोशल मिडीयावर इतरांच्या आजारपणावर खालच्या पातळीवर बोलत असताना आपणही आजारी झालोयत हे लक्षात घ्या.




आजारपणांच्या बाबतील समाजात जागरूकता येणं यासाठी अनेक लोक काम करत असतात. नोव्हेंबर महिन्यात स्तनाच्या कँसर बाबत जागरूकता केली जाते. यावेळी अनेक महिलांशी बोलताना जाणवतं की आजारापेक्षा त्यांना लोकांच्या नजरा आणि शेरेबाजी जास्त त्रासदायक वाटते. अनेकांना समुपदेशनाची गरज लागते. मला वाटते आजारी समाजाला आता समुपदेशन देण्याची गरज आहे, कारण दररोज नवनवीन रोग आपल्याला माहिती होतायत. अनेक दुर्मीळ आजार- लक्षणे समोर येतायत. जसंजसं विज्ञान प्रगत होतंय तसं जसं जेनेटिक आजारांची माहिती होतेय. या सगळ्यांचा सामना करायचा असेल तर समाजाची साथ हवी. इतकं तर आपण सगळे मिळून करूच शकतो.

Updated : 9 Nov 2022 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top