चारा असूनही बुलडाण्यातील जनावरांची कवडीमोल भावात विक्री

146
0
स्वतः जगायचं की आपल्याकडील मुक्या जनावरांना जगवायचं अशा द्विधा मनःस्थितीत सध्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आहे. राज्य सरकारकडून चारा छावण्या मिळाल्या नाहीत, त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रूपयांची ही जनावरं अक्षरशः कवडीमोल किंमतीमध्ये बाजारात विकावी लागत आहेत.

बुलडाण्यात जीवघेणा दुष्काळ

बुलडाणा जिल्ह्यातल्या १३ पैकी ८ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. निम्म्यापेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ असूनही प्रशासनाकडून पुरेशा उपाययोजना राबवण्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढच होतेय. इतका भीषण दुष्काळ असूनही बुलडाण्यात एकही चारा छावणी नाही. त्यामुळं जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त झालाय. अशा परिस्थितीत त्यांनी जनावरं बाजारात विकायला काढली आहेत.

कवडीमोल भावानं जनावरांची विक्री

सरकारनं चारा छावण्याच उभारल्या नाहीत, त्यामुळं नाईलाजानं गेल्या वर्षी १ लाख रूपयांची किंमत असलेली बैलजोडी फक्त २५ हजार रूपयांना विकायची वेळ आल्याचं एका शेतकऱ्यानं मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं. तर सरकारनं जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याची गरज असल्याचं विठ्ठल आकोडे या शेतकऱ्यानं सांगितलं. जून महिन्यात खरीपाचा हंगाम सुरू होतोय. अशा परिस्थितीत हाती पैसा असला तरच पेरणी करता येईल, या मानसिकतेतूनही काही शेतकऱ्यांनी जनावरं विकायला सुरूवात केलीय.

बुलडाण्यातलं पशुधन

लहान पशुधन – ६४,४३७
मोठे पशुधन – ५,९५,५४९
शेळी – मेंढी – ४,१२,९५१
एकूण – १०,७२,९३७

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तुटतोय

ग्रामीण भागातलं अर्थकारण हे शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायाभोवतीच फिरत असतं. मात्र, सततच्या दुष्काळामुळं आधीच शेती अडचणीत आलीय. त्यानंतर जिथं माणसांनाच पिण्याचं पाणीच मिळत नाही तिथं मुक्या जनावरांना कसं जगवावं हा मोठा जटील प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. तर दुसरीकडे शेतीत पिकत नसतांना जोडधंदा म्हणून गाय, म्हैस अशा जनावरांचा मोठा आधार शेतकऱ्यांना होता. मात्र, पाणी नाही, चाराही नाही आणि उपलब्ध चारा हा दुप्पट किंमत देऊन विकत घेणंही शक्य नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी थेट खामगावातील जनावरांच्या बाजारात नेऊन मिळेल त्या किंमतीत जनावरं विकायला सुरूवात केलीय. खामगावच्या बाजारात केवळ बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या मराठवाड्यातूनही मोठ्याप्रमाणावर जनावरं विक्रीसाठी येत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातल्या चाऱ्याची परिस्थिती

दररोज १४०१४ मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता
दरमहा १ लाख २० हजार ४३१ मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता
मार्च ते जून २०१९ पर्यंत लागणारा चारा ४ लाख ८१ हजार ७२४ मेट्रीक टन
सध्या ३ लाख ७० हजार १७३ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे
चाऱ्याची एकूण तूट १ लाख ११ हजार ५५१ मेट्रीक टन
चारा उपलब्ध आहे – डॉ. एन.एच. बोहरा, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, बुलडाणा
जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध आहे. मात्र, तहसिलदार, विभागीय अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक पातळीवरील चाऱ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी २० मे पर्यंत प्रस्ताव मागितलेले आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध आहे. मात्र, तरीही तो पशुधन असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रस्ताव आल्यानंतरच चारा छावण्या दिल्या जाणार असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी चारा छावण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी काहीच माहिती का दिली नाही, असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं चारा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना केवळ प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळं जनावरं विकण्याची वेळ आलीय, अशी चर्चा बुलडाण्यात सुरू झालीय.