आंबेडकरांची प्रेरक पत्रकारिता

0Shares

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून.  जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे होते.  धर्मशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक द्रष्टे विचारवंत विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे.

दलित पत्रकारितेचा प्रारंभ :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला 1920 मध्ये प्रारंभ झाला.  तथापि, त्यांच्यापूर्वी 1888 साली गोपाळ बाबा वलंगकर यांनी पत्रकारितेस सुरुवात केली होती.  23 ऑक्टोबर 1888 रोजी त्यांनी ”विचार विध्वंस” नावाची पुस्तिका लिहिली होती.  समाजाने निर्माण केलेल्या दृष्टचक्रातून अस्पृश्य वर्गाला कसे बाहेर काढावे याचा ध्यास त्यांना लागलेला होता.  दलित समाजातील ते पहिले पत्रकार होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.   त्यानंतर दलित समाजातील शिवराम जानबा कांबळे यांनी ”सोमवंशी मित्र” हे पहिले दलित साप्ताहिक प्रकाशित केले.  पूर्णपणे स्वत:चे अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते.  किसन फागु बंदसोडे यांनी निराश्रीत हिंद नागरिक हे पत्र 1910 साली  ”विटाळ विध्वंसक” 1913 व 1918 साली ”मजूर पत्रिका” सुरु केले.  एका मागोमाग तीन वृत्तपत्रे सुरु करुन त्यांनी जनतेचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.  बंदसोडे यांनी पत्रकारितेमध्ये नवीन आदर्श निर्माण केला.  1914 मध्ये विदर्भातील गणेश गवई यांनी ”बहिष्कृत भारत” हे वृत्तपत्र काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते.  1917 साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते.  या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.  त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले.  ”पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते” हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती.  याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता.  त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या.  म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती.  या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वृत्तपत्रे :

(1) मूकनायक : समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी ‘मुकनायक’ या पत्राच्या पाक्षिकाच्या 31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला.  मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून 1920 साली त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची नांदीच जणू म्हटली.  यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते.  त्यामुळे पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ही जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली.

”आमच्या या  बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.  परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत.  इतर जातीच्या  हिताची पर्वा त्यांना नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप  निघतात.  अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही.  समाज ही नौकाच आहे.  ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारुने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे.  त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही.  म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये.”

मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली छापली जात असे.

काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1||

        नव्हे जगी कोण मुकियाचा जाण सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||

तुकारामाच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्या यात केवढे तरी औचित्य आहे.  वृत्तपत्राचे ‘मूकनायक’  हे नावही त्यांना ”नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण” या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित. बाबासाहेब विलायतेला गेले व 1923 मध्ये ‘मूकनायक’ बंद पडले.

2)  बहिष्कृत भारत :

बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी 3 एप्रिल 1927  रोजी काढले.  या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते.  दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.

आता कोंदड घेऊनि हाती |आरुढ पांइये रथी |

देई अलिंगन वीरवृत्ती |समाधाने |

जगी कीर्ती रुढवी | स्वधर्माचा मानु वाढवी |

इया भारापासोनि सोडवी | मेदिनी हे |

आता पार्थ नि:शंकु होई | या संग्रामा चित्त देई |

एथ हे वाचूनि काही | बोलो नये |

आता केवळ संग्राम |संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही |

अशी युद्धप्रेरणा डॉ. आंबेडकर प्रारंभापासून अस्पृश्यांमध्ये चेतवीत आहेत.

या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित असत. खूप लोक वर्गणीदार झाले नाही.  कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही.  या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत    15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले.  या पाक्षिकाचे एकूण 34 अंक निघाले.  त्यातला 04 जानेवारी 1929 चा अंक सोडता सर्व अंकात अग्रलेख आहेत.  31 अंकांमध्ये आजकालचे प्रश्न ”प्रासंगिक विचार” या सदरामध्ये त्यांनी स्फूट लेख लिहिले आहे.  त्यांच्या स्फूट लेखाची संख्या 145 आहे.

बहिष्कृत भारतच्या पहिल्या अंकात बाबासाहेब म्हणतात :

सुधारणेचा कायदा अंमलात आला आहे.  इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे.  बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधीच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दयी धनी कसाबाच्या स्वाधीन करतो, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे.  अस्पृश्यांची स्थिती सहा वर्षापर्वूीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे.  ही शोचनीय स्थिती जगजाहीर करुन होत असलेली हेळसांड टाळावयाची असेल व घडत असलेल्या अन्यायापासून व जुलुमापासून बचाव करावयाचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी सहा वर्षापूर्वीपेक्षा आज अधिक तीव्र आहे.

बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाही, तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच समजावे. कारण ब्रिटिश सरकारचे नि:पक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठरवले जाईल, इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही हा घोर प्रसंग टाळावयाचा असेल तर, आतापासूनच चळवळीला सुरुवात केली पाहिजे.

 3)  जनता :

जनता वृत्तपत्राचा प्रथम अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला.  संपादक श्री.  देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 रोजी ते साप्ताहिक झाले.

या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ”गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करुन उठेल” हे वाक्य होते.  जनतेत त्यांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून लिहून पाठविलेली पत्रे प्रकाशित झाली आहेत.

1955 पर्यंत जनता सुरु होते.  या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले.  कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाली पण तरी ते खूप दिवस टिकले.  4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.

बाबासाहेबांच्या मृत्युनंतर 1961 साली प्रबुद्ध भारत बंद पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्फूट लेखन :

प्रासंगिक प्रश्नावर लेख हे साधारण ! स्फूट लेखनाचे स्वरुप असते.  या स्फुट लेखनाला विषयांची मर्यादा नसली तरी विस्तार मर्यादा निश्चित आहे.  अशा स्फुटलेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या जीवनदृष्टीचे, त्याच्या चिकित्सकतेचे आणि त्यांच्या विचार वैशिष्ट्याचे प्रतिबिंब उमटत असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने ‘बहिष्कृत भारतात’ आढळते.  ‘जनता’ आणि ‘प्रबुद्धभारतात’ स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते.  बहिष्कृत भारताच्या 1927 सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात ”आजकालचे प्रश्न” या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी ‘प्रासंगिक विचार’ या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे.  विषयांचे वैविध्य हे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.

बालविवाहाचे फलित, ब्राह्मण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ति, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर बाबासाहेबांनी लेखन केले.

डॉ. आंबेडकरांची वृत्तपत्रे आणि चळवळी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्रातून प्रमुख चळवळी यथार्थपणे चालविल्या. त्या अशा:

1)  मानगाव येथे कोल्हापूरजवळ परिषद घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे प्रश्न मांडले. राजर्षि शाहू महाराजांनी या परिषदेत डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाचे स्वागत करुन त्यांच्याकडून या समस्यांना गती मिळेल असे अभिवचन दिले.

2)  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रह केला आणि त्याचे वर्तमान त्यांच्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात आले आहे.

3)  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा एक महत्वाचा टप्पा होता.  या चळवळीचे प्रतिबिंब सुद्ध डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्रातून उमटले आहे.

4) डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करुन जातीव्यवस्थेला विरेाध केला.

5)  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय चळवळीस येवला येथे आपण हिंदू जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली.

 देवेंद्र भुजबळ

 ( लेखक महाराष्ट राज्य माहिती आणि जनसंपर्क संचालनालयात संचालक म्हणून कार्यरत आहेत )

 

4 COMMENTS

  1. I just want to say I am new to blogging and absolutely loved you’re page. Probably I’m want to bookmark your site . You absolutely come with great stories. Bless you for sharing with us your web site.

  2. I have a wordpress blog with a lot of pictures hosted on third party websites. I want all the pictures to be hosted in my wordpress blogs. I don’t want to manually download all pictures and replace them in the posts, i need something to do that automatically..

  3. I have a site, and my content is protected with a Creative Commons license, but I want to copyright it so places like eBaums World doesn’t steal my content. How can I get my entire site copyrighted?.

  4. I ‘d like to have the ability to identify blogs I such as and also have them reveal on my website. Any type of ideas on the very best course to take on this. Any kind of input would be handy.

LEAVE A REPLY

four × four =