हिंमत असेल तर मला अटक करा, अमित शाहांचे ममतांना आव्हान 

काहीही झाले तरी मी जाहीरपणे जय श्रीराम बोलणारच. ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिले आहे.
भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी येणार याचा अंदाज असल्याने भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालसारख्या राज्याकडे वळवला आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी यांचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोर लावल्याने अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
‘ममतादीदी, मी जय श्रीराम बोलतोय. कोलकत्ताला येणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्यक्ष ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये शाह यांच्या आज तीन सभा होणार होत्या. मात्र, जाधवपूरमध्ये अमित शाह यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांना ती सभा रद्द करावी लागली. जाधवपूरहून ममता बॅनर्जी यांचा भाचा निवडणूक लढवत आहे. त्याची उमेदवारी जाऊ नये या भीतीने ममता यांनी अमित शहा यांना सभा घ्यायला परवानगी दिलेली नाही, असा आरोप भाजपने केला आहे.
‘सभा घ्यायला मला अडवाल, पण भाजपचा विजय कसा रोखाल’ असं प्रत्युत्तर अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना दिलं आहे.
दरम्यान लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. त्यातच २०१४ प्रमाणे २०१९ ला मोदी लाट नसल्याने भाजपला २०१९ ची निवडणूक जड जात असल्याने भाजपने पश्चिम बंगाल सारख्या राज्यातून भाजपच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.