त्या’ वक्तव्यामुळे कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी

“स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी एक हिंदू होता. त्याचं नाव होतं नथुराम गोडसे,” असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कळ निधी मय्यम या पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी केल्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला असून अखिल भारतीय हिंदू महासभेनं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

कमल हसन यांनी रविवारी चेन्नईतील अर्वाकुर येथील सभेत बोलताना “स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी एक हिंदू होता. त्याचं नाव होतं नथुराम गोडसे,” असं वक्तव्य केलं होते. विशेष म्हणजे
“हा मुस्लीमबहुल भाग आहे म्हणून मी हे विधान करत नाहीये. गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभं राहून मी हे बोलत आहे,” असं कमल हासन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर हिंदूत्ववादी पक्षांनी यांचा निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान कमल हसन यांनी मुस्लीम मतांसाठी हे वक्तव्य केल्याचा आरोप विऱोधकांनी केलं आहे. येत्या रविवारी अर्वाकुरची येथे पोटनिवडणूक होणार आहे. तिथल्या प्रचारसभेत कमल हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.या अगोदर देखील अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

नथुराम गोडसे याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांची हत्या केली होती. मात्र, हत्या करणाऱ्या नथुरामची अजुनही काही लोक पूजा करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. यात ते ‘माझ्या एका मित्राने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण अशा प्रश्न विचारला म्हणतात त्यावर माझं उत्तर आहे गोडसे. असं ट्विट केलं आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांच्या मते दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. तसंच गोडसे सारख्या व्यक्तीच्या कृत्याचं समर्थन होऊच शकत नाही. अशा भावना नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत. मात्र, कमल हसन यांना या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीने धमक्या येत आहेत. त्या निश्चितच चिंतेची बाब असून गेल्या काही दिवसात कट्टर हिंदूत्ववादाला विरोध करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या हत्या झाल्या आहेत.