“ती”नं बेवड्या नव-याची वरात परत पाठवली

लग्नानंतर दारूड्या नव-यासाठी काम करणा-या त्याला पोसणा-या अनेक स्त्रीया आपण पाहतो. पण गाजियाबादमधल्या  लोनी गावातील तरूणीनं दाखवलेले धाडस समस्त महिलांना बळ देणारं आहे. इथल्या एका तरुणीने उंबरठ्यावर आलेली वरात परत पाठवण्याचा निर्णय घेतला तो बेवड्या नव-यामुळं. लग्नासाठी वरात घेऊन आलेला  नवरदेव लग्नाच्या बोहोल्यावर चढला  तेव्हा पुर्णपणे दारुच्या नशेत होता. आपण ज्याच्यासोबत संपुर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याचं हे रूप पाहून  तरुणीने लग्न करण्यास थेट नकार दिला. ठरलेलं लग्न रद्द झाल्यानं लग्नमंडपातील वातावरणच बदलून गेलं. सगळ्यांच्या उत्साहाचं रूपांतर काळजीत झालं, तणाव निर्माण झाला होता. पण सिनेमातल्या प्रमाणे लग्नासाठी आलेल्या एका तरुणाने तरुणीशी लग्न करण्याची तयारी दर्शवली आणि लग्न थाटामाटात पार पडलं. हा तरुण मुलीच्या नात्यातीलच असून मुलीनं पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

ही घटना आहे लोनीच्या ट्रॉनिका सिटी येथील कॉलनीतील. बुधवारी येथील एका घरात लग्न होतं. यासाठी दिल्लीच्या रोहिणी परिसरातून वरात येणार होती. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी अगदी थाटामाटात नवरदेव आणि वरातीचं स्वागतही केलं. पण नवरदेव बोहोल्यावर चढताच चित्र पालटलं. नवरेदव पुर्णपणे दारुच्या नशेत होता. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं.

नवरदेवाची ही अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी नवरीमुलीने धाडसी पाऊल उचलत लग्न करणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महत्त्वाचं म्हणजे, मुलीच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आणि वरात परत पाठवून दिली. पण लग्न मोडल्यामुळे मुलीचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. यावेळी लग्नात आलेल्या एका तरुणानं आपण लग्न करण्यास तयार असल्याचं मुलीच्या वडिलांना सांगितलं. यावेळी चर्चा करुन सर्वांनी होकार दिला. नातेवाईकांचीही सहमती मिळाल्यानंतर लग्न थाटामाटात पार पडलं.