Home > मॅक्स ब्लॉग्ज > श्री.सिंधीया यांचे पक्षांतर – एक मुक्त चिंतन

श्री.सिंधीया यांचे पक्षांतर – एक मुक्त चिंतन

श्री.सिंधीया यांचे पक्षांतर – एक मुक्त चिंतन
X

श्रीमान ज्योतिरादित्य सिंधीया यांनी कॉंग्रेस पक्षाचा काल राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी भाजपामधे प्रवेश केला आहे. ज्याचे संकेत कालच मिळाले होते पण तरीही काहींना असे वाटत होते की, कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर ते ममता बँनर्जी वा जगनमोहन रेड्डी प्रमाणे नवीन पक्ष काढतील किंवा त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या एमपी कॉंग्रेस या पक्षास पुन्हा जीवित करतील की काय? पण त्यांनी असे काहीही न करता भाजपात प्रवेश केला आहे. याची कारणे नेमकी काय आहेत हे माहित नाही?

श्री. सिंधीया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यापासून काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत तर काही जण त्यांच्या पक्षाबाहेर जाण्यास कॉंग्रेस नेतृत्वाला दोष देत आहेत. राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष सोडलं असलं तरीही राहुल गांधीचा द्वेष करणाऱ्यांना त्यांना नावं ठेवयाची वा शिव्या द्यायची आपसुकच संधी मिळाली आहेे. या संधीचं अनेक विचारवंत सोनं करतानाही दिसून येत आहेत.

कॉंग्रेस समर्थकांपैकी काही जण श्री. सिंधीया यांच्यावर टिका करताना मात्र ताळतंत्र सोडण्याचा घृणास्पद प्रकार सुरू केला आहे,जो पुर्णत: खेदकारक आहे. असे अनेक टिकाकार टीका करताना कुठे पानीपत युद्धाचा तर कुठे झांशीच्या लढाईचा तर कुठे 1857 सालातील सिंधीया घराण्याच्या भुमिकेचा आणि गांधीहत्येत वापरलेल्या गेलेल्या पिस्तुलाचा संदर्भ देत आहेत. मात्र हा सर्व प्रकार पुर्णत: असमर्थनिय आहे, चुकीचा आहे.

कॉंग्रेस सोडून भाजपा प्रवेश हा ज्योतिर्दीत्य यांचा व्यक्तीगत निर्णय आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका त्या कालखंडाच्या अनुषंगाने योग्य ठरते जो त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आहे. सिंधीया 2001 साली राजकारणात आले, त्यापुर्वी त्यांच्या आजोबा, आज्जी वा पंजोबांनी काय केलं ही चर्चाच अयोग्य आहे.

श्रीयुत सिंधीया यांचे पक्षांतर मध्य प्रदेशात कोणत्या अनुषंगाने पाहीले जात आहे,हे मध्य प्रदेशातील वृत्तपत्रांतील बातम्या,त्यावरील प्रतिक्रिया शिवाय फेसबुक, ट्विटर सारख्या समाज माध्यमातील प्रतिक्रिया यावरून पाहता येईल. पण ज्योतिरादित्य यांचे पक्षांतर मध्य प्रदेश वगळता इतर राज्यात कशा प्रकारे पाहीले गेले आहे आणि ते मध्य प्रदेशातील जमिनी वास्तवाशी कितपत मिळते जुळते आहे हा विचार कालपासून कुठेही झालेला दिसला नाही.

ज्योतिरादित्य यांना कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जावे असा मानणारा राजकीय विचारवंतांचा एक मोठा वर्ग गेल्यावर्षी राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून कार्यरत झालेला आहे. त्यात काही जण असेही आहेत की ते वरकरणी कॉंग्रेसबद्दल खूप आत्मियता दर्शवतात पण प्रत्यक्षात त्यांना कॉंग्रेसबद्दल तर ममत्व नाहीच पण गांधी कुटूंबाबद्दल मनात प्रचंड घृणा आहे. म्हणजे गांधी घराण्याला कॉंग्रेसबाहेर काढले की तात्काळ कॉंग्रेस सत्तेत येईल, असा त्यांचा युक्तीवाद असतो. याचा अर्थ त्यांनी ज्योतिरादित्य हे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आहेत असे मनोमन मानलेले असते! पण राष्ट्रीय स्तरावरील कॉंग्रेस नेता पक्ष त्यागतो म्हटल्यावर त्याच्या प्रतिक्रियाही राष्ट्रीय स्तरावर उमटायला हव्यात असा साधा तर्कही ते करत नाहीत कारण त्यांना ना ज्योतिरादित्याबद्दल आपुलकी असते मा कॉंग्रेसबद्दल!

मोदी आणि शहा यांनी कॉंग्रेसमुक्त भारत हे स्वप्न उराशी बाळगले असले तरीही काही राज्यात कॉंग्रेस सत्तेत आहे तर बऱ्याच राज्यात कॉंग्रेस विरोधी पक्षही आहे. तर राष्ट्रीय स्तरावरील कॉंग्रेस नेता पक्ष त्यागतो, यावर प्रतिक्रिया मात्र राष्ट्रीय स्तरावर न येता, त्या प्रादेशिक स्तरावरच आलेल्या आहेत. मध्य प्रदेश वगळता ज्या राज्यात यावर अधिक बोललं गेलं आहे, त्यात प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख करावा लागेल.

श्री. ज्योतिरादित्य यांचे पक्षांतर महाराष्ट्रात खूपच वेगळ्या धर्तीवर पाहीले गेले आहे, ज्याचा मध्यप्रदेशातील अथवा गुना वा ग्वाल्हेर भागातील प्रत्यक्ष वास्तवाशी कितपत सबंध आहे याचा विचार करताना कोणीही दिसत नाही. अनेकांनी याबद्दल विचार करताना या घटनेस मराठा अस्मितेशी जोडले आहे तर काहीचा हेतू राहुल गांधींना लक्ष करणे एवढाच आहे.

कॉंग्रेस मधील ज्या नेत्यांना प्रसन्न चेहरा, दर्शनी स्वरूपातील करीश्मा लाभलेला आहे, अशा नेत्यात ज्योतिरादित्य होते ही बाब खरी आहे. कारण प्रसिद्धी माध्यमांनी तशी त्यांची प्रतिमा राहुल गांधी यांना पर्याय या स्वरूपात रंगवलेली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश वगळता उर्वरीत भारतात नि प्रामुख्याने महाराष्ट्रात या घटनेस खूप धक्कादायक या स्वरूपात पाहीले जात आहे. यात प्रत्यक्ष कितपत तथ्य आहे, ही बाब केवळ मध्य प्रदेशातील जनतेत काय भावना आहे यावरूनच समजू शकेल.

महाराष्ट्रीय जनमानस महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज व त्यांचे वंशज यांना ज्या स्वरूपात पहाते त्याच स्वरूपात ते ज्योतिरादित्य श्री. सिंधीया यांना पहात असल्यामुळे सिंधीया घराणे म्हणजे संपुर्ण मध्य प्रदेश असे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तवात भोसले राजवंशाबद्दल जी आदराची भावना महाराष्ट्रभर आहे तशी ती श्री. सिंधीया राजवंशाबद्दल संपुर्ण मध्य प्रदेशात आजिबात नाही, हे काही जण समजून घ्यायलाच तयार नाहीत. म्हणून या घटनेबद्दलचे महाराष्ट्रातील अनेकांचे आकलन चुकत आहे.

श्री. सिंधींया यांच्या सन 2002 पासून सुरू झालेल्या आज पर्यंतच्या 18 वर्षाच्या काळात त्यांना पक्षाने सन 2002 पासून 2019 पर्यंत सलग 17 वर्ष खासदारकी, सन 2004 ते 2014 सलग दहा केंद्रिय मंत्रीपद दिले. पक्षात वर्किंग कमिटी सदस्यत्व, उत्तर प्रदेश प्रभारीपदही दिले गेले होते शिवाय त्यांना उपमुख्यमंत्री पदाचीही ऑफर दिली गेली होती, असे आजच प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून राज्यसभेसाठीही नामांकन दिले गेले असते पण कॉंग्रेस त्यांना केंद्रिय मंत्रीपद मात्र देऊ शकली नसती. कारण कॉंग्रेस केंद्रात सत्तेत नाही.

मग श्री. सिंधीया पक्षांतर का केले असावे हा विचार करताना कदाचित आजवर कॉंग्रेसने दिलेले त्यांना आपल्या नेता म्हणून असणाऱ्या योग्यतेपेक्षा कमी वाटत असावे आणि भाजपा त्यांना कॉंग्रेसने जे दिल्या त्यापेक्षा नक्कीच,अधिक उत्तुंग, अधिक दिमाखदार वा त्या पेक्षाही खूप काही जास्त देणार असेल म्हणून ते बहुदा भाजपामधे प्रवेशकर्ते झाले आहेत,असाच तर्क योग्य ठरतो.

श्री. ज्योतिरादित्य यांना कालच शुभेच्छा दिल्या आहेत. पण पक्षांतर करून भाजपाममधे गेल्यानंतर त्यांना निदान 17 वर्षापेक्षा तरी अधिक काळ खासदारकी मिळावी व 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केंद्रिय मंत्रीपद मिळावे, वा अगदी त्यांना 2024 साली पंतप्रधानपद मिळावे, या साठीही शुभेच्छा देणे क्रमप्राप्त आहे!

© राज कुलकर्णी

Updated : 12 March 2020 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top