विरोधी पॅनलला मदत केली म्हणून कुटुंबावरच बहिष्कार  

52
0
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांच्या पॅनलला मदत केली म्हणून एका कुटुंबालाच जात पंचायतीनं वाळीत (बहिष्कार) टाकल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तरवाडे इथं ही घटना घडलीय. याप्रकरणी तरवाडे इथल्या सरपंचासह १७ जणांविरोधात जातपंचायत विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ मार्च २०१९ रोजी तरवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीसाठी रामकृष्ण पाटील आणि युवराज पाटील यांनी दोन स्वतंत्र पॅनल उभे केले होते. तक्रारदार-पीडित शरद उखा पाटील यांनी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज पाटील यांच्या पॅनलला मदत केली. म्हणून शरद पाटील यांचे नातेवाईक कौतिक तोताराम पाटील , सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील , मनोहर श्रीराम पाटील , नाना श्रीराम पाटील , राजेंद्र विठ्ठल पाटील , श्रीराम महिपत पाटील , समाधान नाना पाटील , बापू मोतीराम पाटील , छोटू बापू  पाटील , किशोर नाना पाटील , अशोक श्रीराम पाटील , नंदलाल कौतिक पाटील , मगन रामदास पाटील, सुदाम अभिमन पाटील , लोटन अभिमन पाटील , हिम्मत अभिमन पाटील , शिवाजी अशोक पाटील , नामदेव कौतीक पाटील यांनी एकत्रित येऊन शरद पाटील यांच्या कुटुंबालाच वाळीत टाकलं.
त्यासाठी त्यांनी जातपंचायतीमध्ये हे प्रकरण आणलं, तिथं जातपंचायतीनं शरद पाटील आणि त्यांच्या आणखी एका नातेवाईकाच्या कुटुंबावरच बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले. जातपंचायतीच्या या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करत शरद पाटील यांच्या कुटुंबियांना शाळा, सामाजिक कार्यक्रम, स्मशनाभूमी, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं, अशी तक्रारच शरद पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी १७ जणांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलम ३,४,५,६ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.