अंबानींना ११२० कोटींची करमाफी ?

4130Shares
राफेल विमान खरेदी व्यवहारानंतर पुन्हा एकदा अनिल अंबानी चर्चेत आले आहेत. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अंबानी यांच्या फ्रान्सममधील टेलिकॉम कंपनीला सुमारे ११२० कोटींची करमाफी दिल्याचा गंभीर दावा फ्रेंच वर्तमानपत्र ले मॉडने केलंय.
राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्य घालून काही फेरबदल केले आणि अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा करून दिला, असाही आरोप करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर या दाव्याला महत्त्व प्राप्त झालंय.
राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा फेब्रुवारी – ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरू होता. याच दरम्यान अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला १२२० कोटींची करमाफी देण्यात आल्याचा दावा ले मॉड या वर्तमानपत्रानं केलाय. त्यामुळं ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधक या मुद्द्याचंही भांडवल करण्याची शक्यता निर्माण झालीय.
काँग्रेसचा आरोप
काँग्रेसनं आधीच राफेल व्यवहारात पंतप्रधान मोदींवर मध्यस्थीचा आरोप केलेला आहे. याच आरोपाचा काँग्रेसनं आता टेलिकॉम करमाफीनंतरही पुनरूच्चार केला आहे. राफेल करार झाल्यापासूनच राहुल गांधींसह सगळ्याच प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राफेल करारात घोटाळा झाला आहे असा आरोप केला. तसेच देशातील जनतेचे पैसे मोदींनी लुटून अनिल अंबानींना दिले असेही राहुल गांधींनी वारंवार म्हटले आहे. आता अनिल अंबानी यांच्या फ्रान्स येथील कंपनीला ११२० कोटींची करमाफी दिल्याचे वृत्त फ्रान्स मीडियाने दिले आहे.