महिलांना गाळा लिलावात 50% आरक्षण, कळंब नगरपालिकेचा स्तुत्य निर्णय

0Shares
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगरपालिकेने गाळे लिलावात महिलांना 50% आरक्षण देण्याचा ठराव नुकताच सर्वानुमते मंजूर केला आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कळंब नगरपालिकेच्या आरक्षण क्र. 32 आणि 33 मधील जुन्या बस स्थानकावरील गाळे केंद्राच्या लिलावासंदर्भात 10 जून रोजी पालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या शॉपींग सेंटरच्या दुकानात शासन आदेशानुसार फक्त अपंग आणि अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण प्रस्तावित होते.
नगरपालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन सत्तेत वाटा दिला आहे. एखाद्या महिलेला आर्थिक स्वयंपूर्णता मिळण्यासाठी किंवा कधी एकटं पडण्याचा प्रसंग आला तर आधार व्हावे. म्हणून हा निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव कळंब नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सभागृहात मांडला होता. त्यानंतर याची आता अंमलबजावणी होणार आहे. महिलांना गाळे लिलावामध्ये आरक्षण दिल्याने त्या स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत होणार आहे.